महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील अहिर मुरा गावानजीक कोळशाच्या शेकोटीचा धूर कंटेनरमध्ये साठल्याने दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. या मजुरांनी थंडीपासून बचावासाठी कोळशासाठी शेकोटी पेटवली होती; मात्र कंटेनरचे दरवाजे, खिडक्या बंद केल्याने धूर साठल्याने ते गुदमरले. मतिऊर रहमान (वय 53, रा. सिस्वा, बिहार) व विपिन तिवारी (55, रा. गोपालगंज, बिहार) अशी या मजुरांची नावे आहेत. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत माहिती अशी ः अहिर मुरा परिसरात उत्तेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याचे व पुलांचे काम सुरू आहे. या कामासाठी बिहारसह इतर राज्यांतील मजूर आले आहेत. बांधकामावरील मजुरांच्या निवाऱ्यासाठी कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. एका कंटेनरमध्ये पार्टिशन केलेल्या दोन खोल्यांमध्ये चार मजूर राहत होते. सध्या महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी आहे. या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी सोमवारी रात्री मजुरांनी एका घमेल्यात कोळसा पेटवला. बराच वेळ शेकोटीजवळ बसल्यानंतर मतिऊर रहमान आणि विपिन तिवारी हे दोघे दुसऱ्या खोलीत झोपायला गेले. त्यांनी शेकोटी पायाखाली ठेवून दरवाजे, खिडक्या बंद केल्या. त्यामुळे कोळशाचा धूर कंटेनरमध्येच साठून दोन्ही मजुरांचा गुदमरून झोपेतच मृत्यू झाला.
सकाळी बराच वेळ झाले तरी दोघेही न उठल्याने इतर सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने ठेकेदार सचिन कदम यांना संपर्क करण्यात आला. यानंतर दोघांनाही तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयात केले. हे मृतदेह बिहारला पाठवण्याची तयारी ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोनि बापूसाहेब सांडभोर व पोलिस उपनिरीक्षक रुपाली काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याचबरोबर फॉरेन्सिक पथकानेही पाहणी केली.