महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्यावतीने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रोज ‘स्वच्छ भारत का इरादा’चा गजर केला जात असला, तरी तो केवळ घोषणापुरताच मर्यादित राहिला आहे का? असा सवाल सध्या महाबळेश्वरकर करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरात प्रमुख रस्ते, बाजारपेठा तसेच गल्लीबोळांमध्ये कचरा, दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. सध्या शहरात कोट्यवधींचा ठेका घेणारा ठेकेदार सुस्त अन् पालिका प्रशासन निर्धास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये नगराध्यक्ष लक्ष घालणार का? असा सवाल केला जात आहे.
दैनंदिन स्वच्छतेची कामे नियमित न झाल्याने शहरातील स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही नाक धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटननगरीची सध्याची अवस्था पाहता ‘स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर’ची ओळख मलीन होत चालली आहे.
वर्षभरापूर्वी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहराच्या स्वच्छतेचा ठेका मे. व्ही. डी. के फॅसिलिटी सर्व्हिसेस या खासगी कंपनीला तीन वर्षांसाठी देण्यात आला. हा ठेका तब्बल 11 कोटी 25 लाख 17 हजार 775 रुपये इतक्या रकमेचा आहे. प्रतिवर्षी सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिकचा आहे. मात्र, हा ठेका संबंधित कंपनीकडे गेल्यापासून शहरातील स्वच्छतेची ऐशी की तैशी झाली आहे. या ठेक्यामध्ये घरोघरी ओला व सुका कचरा संकलन, तो पालिकेच्या कचरा डेपोपर्यंत पोहोचविणे, शहरातील रस्ते व गटारांची साफसफाई, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांची स्वच्छता अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. मात्र प्रत्यक्षात ही कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
मुख्य बाजारपेठ, विविध सोसायट्या व गल्लीमोहल्ल्यांमध्ये घंटागाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने तीन-तीन ते चार-चार दिवस कचरा उचलला जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याने भरलेली गटारे, प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र अस्वच्छता अशी परिस्थिती नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. जागरूक नागरिकांनी गल्लीबोळातील कचऱ्याचे फोटो पालिका प्रशासनाकडे पाठविल्यानंतरच ठेकेदाराचे कर्मचारी संबंधित ठिकाणी पोहोचून कचरा उचलतात. अन्यथा कचरा तसाच रस्त्यावर पडून राहतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छतेच्या बाबतीत यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराने उल्लेखनीय कामगिरी करत ‘कचरामुक्त’ शहरांचे 3-स्टार मानांकन, तसेच ++ दर्जा प्राप्त केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांतील अस्वच्छतेमुळे ही गौरवशाली परंपरा धोक्यात आली आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छतेबाबत पाहणी केली. मात्र, या स्वच्छता ठेकेदाराबाबत सखोल चौकशी करून त्याचे हितसंबंध तपासणे गरजेचे आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या, मनमानी कारभार करणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.