महाबळेश्वर : हिलस्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शहरात पालिकेने उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे महाबळेश्वर शहरासह फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे आहे. सीसीटीव्ही बसवायचे कुणी? यावरून टोलवाटोलवी केली जात आहे. लाखो रूपये खर्च करून बसवलेले कॅमेरे नादुरूस्त झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
काही वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख चौक व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र, वेळेवर दुरुस्ती व देखभाल न झाल्याने अनेक कॅमेरे बंद पडले असून काहींची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. गंजलेले बॉक्स, रंग उडालेली उपकरणे व निष्क्रिय कॅमेरे यामुळे ही यंत्रणा केवळ नावालाच उरली आहे. चोरी, घरफोडी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. परंतु शहरात भुरट्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना ही यंत्रणाच निष्क्रिय असल्याने गुन्हे रोखणे व गुन्हेगारांचा माग काढणे अवघड होत आहे.
महाबळेश्वरला वर्षभर लाखो पर्यटक भेट देतात. वेण्णा लेक नौकाविहार, वाहनतळ, प्रदूषण कर आदी स्रोतांमधून पालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत असतानाही मूलभूत सुरक्षाविषयक सुविधा पुरवण्यात प्रशासन मात्र पिछाडीवर आहे. शहरातील मरी पेठ, गवळी मोहल्ला, कोळी आळी, रामगड स्कूल परिसर तसेच विविध सोसायट्यांमध्ये अद्याप सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या भागांमध्ये सुरक्षा धोक्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पोलीस व पालिका प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र दिसून आले. पोनि बापूसाहेब सांडभोर आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सीसीटीव्हीची देखभाल कोणी करायची, याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली होती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरांवर केलेला लाखो रूपयांचा खर्च आता वाया गेला आहे.