सातारा

Mahabaleshwar news: महाबळेश्वर बसस्थानकाच्या छताचा भाग कोसळला

सुदैवाने हा भाग कोसळला त्यावेळी खाली कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी महाबळेश्‍वर बसस्थानकाच्या छताचा सिमेंटचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. सुदैवाने हा भाग कोसळला त्यावेळी खाली कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे बसस्थानकाच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीने दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील हजारो नागरिक विविध कामांसाठी एसटी बसने शहरात ये-जा करतात. मंगळवारी आठवडे बाजार असल्याने खरेदी, शासकीय कामे आणि इतर कारणांसाठी नागरिकांची गर्दी बसस्थानक परिसरात असते. दिवसभराची कामे आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकात मोठी वर्दळ असते. अशातच सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास बसस्थानकातील स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या मार्गावरील छताचा सिमेंटचा मोठा भाग अचानक कोसळला.

घटनेनंतर परिसरात काही काळ घबराट पसरली. मात्र, त्या वेळी संबंधित ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर बसस्थानकाच्या इमारतीतील उर्वरित छताचा भागही धोकादायक अवस्थेत असल्याची चर्चा प्रवाशांमधून सुरू झाली आहे. पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संपूर्ण इमारतीची तांत्रिक तपासणी करून धोकादायक भाग तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT