महाबळेश्वर : राज्याचे नंदनवन महाबळेश्वर दिवाळी हंगामाच्या पार्शभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात धुके, कडाक्याची थंडी अधूनमधून रिमझिम पाऊस अश्या बदललेल्या अल्हाददायक वातावरणाची अनुभूती पर्यटनास आलेल्या पर्यटकांना मिळत आहे. दिवाळी हंगमासह पर्यटकांच्या स्वागतासाठी व्यापारी व्यावसायिक सज्ज झाले आहेत. साफसफाई रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यामध्ये आले असून आता पर्यटकांची देखील रेलचेल वाढली आहे.
महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही गिरिस्थानांवर आता दिवाळी हंगमाच्या तयारीला वेग आला असून चार महिन्यांच्या पावसाळी हंगामानंतर येणाऱ्या दिवाळी हंगाम हा महाबळेश्वरवासियांच्या दृष्टीने व्यवसायिकदृष्टया महत्वाचा मानला जातो. त्याअनुषंगाने तयारी जोरदार सुरु आहे दिवाळी हंगामाआधी साफसफाई स्वच्छतेची कामे रंगरंगोटीची कामे उरकली असून अनेक हॉटेल व्यवसायिकांसह स्थानिक दुकानदारांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या दिवाळी हंगामात महाबळेश्वरवासिय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीची सुट्टी सुरु होणार असल्याने या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. पर्यटनास आलेले पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात, अनुभवण्यात मश्गुल झाले असून पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
येथील पर्यटनास प्रसिद्ध असलेले व निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेले केट्स पॉईंट, महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट, सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे असलेली ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजू लागली आहेत.
नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक सह परिसरास पर्यटकांची गर्दी होत आहे. नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. थंड आल्हाददायक वातावरणात पर्यटक नौकाविहार करताना पहावयास मिळत आहेत. ऐनवेळी मुक्कामासाठीची अडचण होऊ नये या दृष्टीने एक महिन्याआधी पासूनच येथील हॉटेल्स बंगलो लॉजिंग आरक्षित झालेले आहेत.
महाबळेश्वच्या हेरिटेज बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी पर्यटकांची रेलचाल असून येथील उबदार कपडे चप्पल खरेदीकडे पर्यटकांचा कल अधिक आहे. तसेच चणे जॅम चिक्की फज अश्या प्रसिद्ध खाद्यापदार्थांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक करत आहेत.