म‌’श्वरमधील बसवेश्वर चौकाचे काम रेंगाळले 
सातारा

Mahabaleshwar News : म‌’श्वरमधील बसवेश्वर चौकाचे काम रेंगाळले

मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप; 10 लाखांचा निधी झाला होता मंजूर

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : गेल्या काही महिन्यांपासून पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महाबळेश्वर शहराच्या प्रवेशद्वारावर सेठ गंगाधर माखरिया उद्यानानजीक साकारण्यात येणाऱ्या श्री क्रांतिसूर्य जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर चौक सुशोभीकरण काम रेंगाळले आहे. जागोजागी पडलेली दगडी, गंजलेल्या सळ्या काळवंडलेल्या भिंती व गतवर्षी घातलेला हार देखील जैसे थे असून यामुळे संपूर्ण परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी समाजाची केवळ आश्वासनांवर बोळवण करून प्रत्यक्ष कामाची मात्र वाट लावली. तसेच समाजबांधवांनीही मुख्याधिकाऱ्यांना याचा जाब न विचारल्याने 10 लाखांचे हे काम रखडले आहे.

गेली अनेक वर्षे लिंगायत समाजबांधवांकडून महात्मा बसवेश्वर यांचे नाव महाबळेश्वर शहरातील एखाद्या प्रमुख चौकास देण्याची मागणी होत होती. समाजबांधवांच्या मागणीची दाखल घेत तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी 2017 मध्ये सेठ गंगाधर माखरिया उद्यानाजवळ असलेल्या चौकाला श्री क्रांतिसूर्य जगत्‌‍ज्योती महात्मा बसवेश्वर चौक असे नाव देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. चौकास नाव दिल्यानंतर देखील या सुशोभीकरणाच्या कामास मंजूरी देण्यात आली. महाबळेश्वरच्या या चौक सुशोभीकरणाचे भूमिपूजन वर्षभरापूर्वी करण्यात आले. यासाठी 10 लाखांचा निधीही मंजूर होवून काम सुरू करण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदाराने हे काम अधर्वटच ठेवण्यात आले. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी काम सुरू करण्यात तत्परता दाखवली मात्र त्यानंतर दुर्लक्ष केले.चौक सुशोभीकरण अपूर्णावस्थेत असल्याने चौकालाच बकाल स्वरूप आले आहे.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिवशी लावलेला हार अजूनही त्यांच्या नावाच्या पाटीवर कुजलेल्या अस्वस्थेत तसाच पडून असल्याचे चित्र आहे. याचे पालिका अधिकारी ना समाजाचे पुढे पुढे करणारे नेते मंडळी कुणालाच याकडे ढुंकून देखील पहावयास वर्षभरापासून वेळच मिळाला नाही. त्यामुळे या परिसराची दयनीय अवस्था झाली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी वेळेत काम करण्याचे आश्वासन समाजबांधवांना दिले होते. मात्र, या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. प्रारंभी सुशोभीकरण काम वेगाने सुरू झाले खरे त्यानंतर मात्र या कामास ब्रेक लागला व त्यानंतर आजअखेर एक विटही या परिसरात हलली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT