महाबळेश्वर : राज्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्या आणि पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीच्या महाबळेश्वरमध्ये पावसाने अक्षरशः विक्रमी हजेरी लावली आहे. 1 जून ते 1 ऑगस्ट या केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 146.5 इंच (3721.70 मिमी) पावसाची नोंद झाली असून, हा आकडा आता दीड शतकाकडे (150 इंच) वेगाने कूच करत आहे. या संततधारेमुळे महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलले असून, दाट धुके, थंडगार हवा आणि रिमझिम सरींचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
यंदा महाबळेश्वरमध्ये पावसाचे आगमन लवकर झाले. मे महिन्यातच कोसळलेल्या अवकाळी पावसाने पर्यटकांना उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव दिला होता. त्यानंतर जूनच्या दुसर्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने महाबळेश्वर आणि पाचगणीची तहान भागवणारा वेण्णा तलाव 21 जून रोजीच पूर्ण क्षमतेने भरला. हा एक विक्रमच मानला जात आहे. संपूर्ण जुलै महिन्यात पावसाची संततधार कायम होती. दररोज सरासरी तीन ते चार इंच पावसाची नोंद होत होती, ज्यामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. या दमदार पावसामुळे 19 जुलै रोजीच पावसाने 100 इंचांचा (शतक) महत्त्वाचा टप्पा ओलांडला होता.
आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने लवकरच दीड शतकाचा विक्रमही पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या अद्वितीय निसर्गसौंदर्याचा आणि मनमोहक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दाट धुक्यात हरवून जाणे, कधी रिमझिम तर कधी धो-धो बरसणार्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. पर्यटन स्थळांवर आणि रस्त्यांवर पर्यटकांची मोठी रेलचेल असून, महाबळेश्वरमधील वर्षा पर्यटनाला अक्षरशः उधाण आले आहे.