सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय पक्ष पतळीवर झाला आहे. संघटनशक्तीच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकार्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, जयवंत शेलार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शारदा जाधव, संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख वर्षाताई आरडे, शहरप्रमुख निलेश मोरे आदी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, शिवसेना पक्षाने केलेली विकासकामे लोक हितकारी योजना आणि शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे, ही आजची गरज आहे. याच माध्यमातून आपण लोकांचा विश्वास मिळवू शकतो. सातारा जिल्हा पालकमंत्री कार्यालय राज्यातील अगर कामगिरी करणारे कामगिरीचा थेट लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मिळेल याबाबत माझा विश्वास आहे. या बैठकीत पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बूथस्तरीय संघटन बळकट करणे, महिला व युवकांचा सक्रीय सहभाग वाढवणे तसेच स्थानिक प्रश्नांवर संघटित पद्धतीने काम करणे या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. भगव्या विचारांचा झेंडा अधिक बुलंद करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त झाला.