सातारा

पाऊस काळ बनून आला अन् होत्याचं नव्हतं करुन गेला

backup backup

खटाव; अविनाश कदम : रात्री साडेअकरा वाजता धो-धो मुसळधार पावसाला सुरुवात होते. नांगरलेल्या शेतात बसविलेली 250 मेंढरं वाचविण्याची तीघा मावसभावांची धडपड सुरु होते. अचानक शेतात पाण्याचा भलामोठा लोट येतो आणि सगळं होत्याचं नव्हतं होतं. मेंढरं चिखलात रुतून बसतात. काही शेजारच्या ऊसात आडोशाला जातात. चिखलातून मेंढर उपसून काढायचे प्रयत्न सुरु होतात. जीवाची पर्वा न करता केलेले तीन्ही भावांचे प्रयत्न तोकडे पडतात. रात्रीच्या किर्र आंधारात पावसाने आणि गारठ्याने तब्बल 40 मेंढरं दगावतात. पै-पै जोडून, कित्येक खस्ता खाऊन वाढविलेल्या पाच लाखांच्या मेंढरांचा मृत्यू एका भावाचा संसार उद्ध्वस्त करुन टाकतो.

नशीबाची थट्टा मांडणारी ही घटना आहे खटावमधील हुसेनपूर शिवारातील. बुधवारी रात्री खटावचे मेंढपाळ रामचंद्र चव्हाण आणि त्यांचे मावसभाऊ काका जाधव यांनी हुसेनपूर शिवारातील एका शेतात सहा दिवसांपासून बसविलेली 250 मेंढरं वाघर लावून बंदीस्त केली. शेजारीच आडोसा करुन चव्हाणही झोपी गेले. रात्री साडेअकरा वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. बारा वाजता पावसाने रौद्र रुप धारण केले. मुसळधार पावसाला सुरुवात होताच चव्हाण आणि त्यांच्या भावाने वाघर काढून मेंढरांना वाचवायचे प्रयत्न सुरु केले. शेत नांगरलेले असल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. अचानक ताल फुटून पाण्याचा मोठा लोट आला. मेंढरं जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. अनेक मेंढरं चिखलात रुतून बसली. काही मेंढरांनी शेजारच्या ऊसाच्या शेतात आडोसा शोधला.

चव्हाण आणि त्यांच्या भावाने चिखलात रुतून बसलेली मेंढरं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. रात्रीच्या किर्र आंधारात हाताला लागतील तितकी मेंढरं चिखलातून उपसून काढताना चव्हाण आणि त्यांचे भाऊ अतिपरिश्रमाने थकून गेले होते. तरीही त्यांची लाखमोलाची मेंढरं वाचवण्याची धडपड सुरुच होती. रात्रभर त्यांनी मेंढरं वाचवण्याचे प्रयत्न केले. पहाटे थोडे-थोडे दिसायला लागल्यावर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अनेक मेंढरं चिखलात रुतून आणि गारठ्याने मरुन पडली होती. शेजारच्या ऊसाच्या शेतात गेलेल्या मेंढरापैंकीही काही मृत पावली होती तर काही गारठून आकडली होती. मोठ्या कष्टाने वाढवलेले पशुधन अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने रामचंद्र चव्हाण पुरते कोलमडून गेले आहेत.

माझा भाऊ ना जेवला ना घराकडे गेला…

गेल्या दोन दिवसांपासून माझा भाऊ घराकडं गेला नाही. त्याने एक घासही खाल्ला नाही. त्याची एकट्याची 40 मेंढरं मेली आहेत. आम्ही कष्टाने या व्यावसायात आत्ता कुठे उभे राहत होतो. पावसाने मात्र होत्याचं नव्हतं केलं. माझ्या भावाची चूल पेटणही आता मुश्कील आहे. पाया पडून विनंती करतो की शासनाने आम्हाला मदत करावी, अशी काका जाधव यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

पावसाचा तडाखा इतका मोठा होता की आम्हाला हालचाल करायला मर्यादा आल्या. आम्ही दोघांनी जीवाची पर्वा न करता जमतील तितकी मेंढरं चिखलातून उपसली. काही ऊसात पळाली. रुतलेली काही आणि ऊसातील काही गारठ्याने मेली. जिथे चिखलातून आमचेच पाय उचलता येत नव्हते तिथे त्या मुक्या प्राण्यांचे काही चलले नाही. माझ्याच कळपातील 40 मेंढरं दगावल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने आम्हाला मदत करुन आमच्या जगण्याची सोय करावी.
– रामचंद्र चव्हाण, मेंढपाळ, खटाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT