दहिवडी : माण तालुक्यातील लोधवडे येथे वृद्ध दाम्पत्याच्या घरावर शस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या संशयितांना दिवडी पोलिसांनी अटक केली. अत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या या गुन्ह्याचा तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे छडा लावत पोलिसांनी सात संशयितांसह एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून चोरीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा तब्बल ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोधवडे (ता. माण) येथील नाळवावस्ती परिसरात नारायण बीरा चोपडे (वय ६६) हे कुटुंबासह राहतात. १० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे दोनच्या सुमारास काही अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. हातातील हत्यारे दाखवत घरातील व्यक्तींना धमकावून गप्प बसवण्यात आले. त्यानंतर संशयितांनी नारायण चोपडे यांच्या पत्नी तुंगाबाई यांच्याकडे पेटी व कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. चाव्या देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी धमकावून चाव्या हिसकावून घेतल्या.
घरातील पेटीत ठेवलेले मोहनमाळ, राणीहार, कर्णफुले तसेच अन्य सोन्याचे दागिने लुटले. एवढ्यावरच न थांबता तुंगाबाई यांच्या गळ्यातील सोन्याच्या मणिमंगळसूत्रातील मणीही हिसकावून तोडून नेले. या दरोड्यात सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. घटनेनंतर दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयितांचा माग काढत सात संशयितांसह एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनंतर संशयितांकडून दरोड्यातील चोरीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चार मोटारसायकली आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.