सातारा : व्यवसाय भांडवलासाठी बँकेतून ओळखीच्या माध्यमातून कर्ज काढून देतो, असे सांगून 5 लाख 55 हजार रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याची तक्रार महिलेने दिली. त्यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश भोसले व समीर शेंडे या दोघांविरुद्ध स्नेहल प्रिन्स कुंभार (वय 29, रा. तामजाईनगर, सातारा) या महिलेने तक्रार दिली आहे. ही घटना युनियन बँक ऑफ इंडिया, एमआयडीसी सातारा या परिसरात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अधिक माहिती अशी, स्नेहल कुंभार यांचे नागरी सुविधा केंद्र आहे. संशयित गणेश भोसले व समीर शेंडे यांनी स्नेहल कुंभार यांना ‘बँकेत आमची ओळख आहे. आम्ही कर्ज मिळवून देतो,’ असे सांगून बँकेतून 9 लाख 90 हजारांचे कर्ज मंजूर केले; मात्र स्नेहल यांना त्या रकमेपैकी 4 लाख 35 हजार रुपयेच दिले. संशयित दोघांनी 5 लाख 55 हजार रुपये घेऊन स्नेहल यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याने स्नेहल कुंभार यांनी दि. 25 सप्टेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.