सातारा : बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत गोवा बनावटीची ट्रकभरून निघालेली दारू सातारा पोलिसांनी जप्त केली. तब्बल 85 लाखांची ही दारू असून, याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
सचिन विजय जाधव (रा. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली), जमीर हरुण पटेल (रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 29 एप्रिल रोजी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (एलसीबी) एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा एलसीबी, उत्पादन शुल्क व बोरगाव पोलिसांचे पथक तयार केले. हे पथक बोरगाव गावच्या हद्दीतील सर्व्हिस रोडवर उरमोडी नदीजवळ दबा धरुन होते. मंगळवारी पहाटे 3.10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ट्रक थांबवून पाहणी केली असता गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीची दारु मिळाली.
पोलिस, उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असता दारुची किंमत अंदाजे 84 लाख 41 हजार 40 रुपये एवढी होती. याशिवाय ट्रक असा सर्व मुद्देमाल 1 कोटी 11 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण, सपोनि धोंडीराम वाळवेकर, सपोनि रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिगाडे, परितोष दातीर, पोलिस साबीर मूल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.