भिलार : गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर अखेर वन विभागाने उपाययोजना करत पिंजरा लावला अन् हा बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.
पांगारी व भोसे परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. बिबट्याला पकडण्यासाठी रात्रगस्त सुरू होती. अखेर वनविभागाच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. वनविभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षितस्थळी हलवण्याची पुढील कार्यवाही वनविभागाकडून सुरू आहे. वनविभागाच्या या तत्परतेमुळे परिसरातील मोठी चिंता दूर झाली आहे.
या कारवाईत वन परिमंडळ अधिकारी आर. व्ही. काकडे, वनरक्षक तानाजी केळगणे, बा. सी. जावीर, संजय भिलारे यांनी सहभाग घेतला. यावेळी राम गोळे, राहुल गोळे, तुषार गोळे, विजय गोळे, आदित्य गोळे, लखन गोळे, सौरव गोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.