leopard terror  Pudhari
सातारा

Satara leopard sighting: ढेबेवाडी विभागात बिबट्याची दहशत !

अंगणात भांडी घासत असलेल्या युवतीसमोर हजेरी; स्थानिकांच्या सुरक्षेचा विषय गंभीर

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी : ढेबेवाडी विभागात मागील आठ ते दहा वर्षांपासून बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. विविध गावांतील शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकदा बिबट्यांनी थेट गोठ्यात घुसून जनावरे ठार मारल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच शिद्रुकवाडीत भांडी घासणाऱ्या युवतीसमोर बिबट्याने हजेरी लावल्याची धक्कादायक घटना समो आली आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिद्रुकवाडीत रात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधात आलेल्या बिबट्याने लोकवस्तीत प्रवेश केला. यावेळी आपल्या घरासमोर अंगणात भांडी घासत बसलेल्या निकिता म्हेत्रेकर या युवतीसमोर अवघ्या काही फुटांवर बिबट्या येऊन उभा राहिला. अचानक समोर आलेल्या या बिबट्याला पाहताच निकिता घाबरून जोरात ओरडली आणि भीतीने बेशुद्ध पडली. रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निकिताच्या आरडाओरडीनंतर कुटुंबीय व शेजारी तातडीने धावून आल्याने बिबट्याने जवळच्या झाडीत पळ काढला. जीवावर बेतलेल्या या प्रसंगातून निकिता बचावली असली तरी तीव्र धक्क्‌‍यामुळे तिला तळमावले येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.

डोंगरपायथ्याला वसलेल्या शिद्रुकवाडीत वन्य प्राण्यांचा उपद्रव सातत्याने जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा लोकवस्तीत वावर वाढला असून, आतापर्यंत अनेक कुत्री, कोंबड्या व शेळ्यांचा बळी गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे, गावातील सुमारे 15 ते 20 कुत्र्यांची संख्या आता अवघ्या दोनवर आली असल्याने भीती अधिकच वाढली आहे. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही बिबट्याचा वावर निदर्शनास आला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून सूर्यास्तानंतर ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. भर लोकवस्तीत बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT