उंडाळे : काले (ता. कराड) येथील प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काले परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संतोष पाटील हे गुरुवारी रात्री काले येथून संजयनगर येथील घरी मोटारसायकलवरून जात होते. यावेळी काले संजयनगर रस्त्यावरील गुंडगेचा माळ शिवारात उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. बिबट्या अंगावर येत असल्याचे लक्षात येताच संतोष पाटील यांनी प्रसंगावधान राखत मोटारसायकलचा हँडल घट्ट पकडून मान मागे वळवली. त्यामुळे ते बिबट्याच्या थेट हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याच्या पायांची नखे गळ्याला लागल्याने पाटील जखमी झाले, तरीही धैर्य न सोडता ते सुखरूप घरी पोहोचले. त्यांनी तत्काळ मोबाईलद्वारे गावातील युवकांना घटनेची माहिती दिली. काले येथील दवाखान्यात संतोष पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले. बिबट्याचा हल्ला थेट गळ्याच्या दिशेने झाल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे. या घटनेनंतर काले, संजयनगरसह परिसरातील शिवारांमध्ये शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या भागात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या असून वनविभागाने तातडीने लक्ष घालावे, पिंजरे लावावेत तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.