सातारा

Balkrishna Nikam martyr: शहीद जवान बाळकृष्ण निकम यांच्यावर अंत्यसंस्कार

अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर; फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या ट्रकमधून अंत्ययात्रा

पुढारी वृत्तसेवा

पाटण : पिंपळोशी, ता. पाटण गावचे जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय 41) हे सिक्कीम राज्याच्या दुर्गम भागात सीमारेषेवर आपले कर्तव्य बजावत असताना बुधवार दि. 11 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास शहीद झाले. त्यांचे पार्थिक चौथ्यादिवशी शनिवारी सकाळी पाटणमध्ये दाखल झाले. यावेळी फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या ट्रकमध्ये त्यांचे पर्थिव ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर शनिवार दि. 14 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पिंपळोशी गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल व पोलीस दलाच्यावतीने त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

दरम्यान, ‌‘शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे‌’, भारत माता की जय, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. शहीद जवानाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो नागरीक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. जवान बाळकृष्ण निकम हे सिक्कीम येथे अतिदुर्गम ठिकाणी भारताच्या सिमारेषेवर 80 किलोमीटर लांब जवळपास 2 हजार मीटरहून अधिक उंच असलेल्या पहाडी परिसरात ते रेडीओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी सेवा बजावत असताना बुधवार दि. 11 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ते शहीद झाले. 2003 साली ते सैन्यदलात भरती झाले होते. जवळपास 23 वर्षे त्यांची सैन्य दलात सेवा झाली होती. 2027 रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. तोपर्यंत त्यांच्यावर काळाने घाला घातला.

त्यांचे पार्थिक चौथ्यादिवशी पाटण शहरात आणण्यात आले. यावेळी त्यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या सैन्य दलाच्या ट्रकमध्ये ठेवून म्हावशी गाव ते पाटण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या केरापुलापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अंत्ययात्रेत हजारो नागरीक, महिला, युवक, युवती, शाळेचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. शहीद बाळकृष्ण निकम अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर निवासस्थानासमोर मानवंदना देण्यात आली. तद्नंतर जवान बाळकृष्ण निकम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संतोष पाटील, पोलीस अधिक्षक तुषार दोषी, भाजपाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यासह लष्करी अधिकारी, माजी सैनिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी सैन्यदल व पोलीस दलाच्यावतीने शहीद बाळकृष्ण निकम यांना बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी हजारो नागरीकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT