केळघर : मेढा-महाबळेश्वर मार्गावर केळघर घाटात काळा कडा येथे महाकाय दरड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. सोमवारी सायंकाळी ६ वाजता दरड कोसळली असून, ती हटवण्याचे काम रात्रभर सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवली आहे.
केळघर घाटात काळा कडा ते माचुतर या ३ कि. मी. परिसरात रस्ता अरुंद असून, दुहेरी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी साईटपट्ट्या रस्त्यावरील पाण्याने पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत. अशातच सोमवारी सायंकाळी मोठी दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.
दरड हटवण्यासाठी जेसीबी व यंत्रणा मागवण्यात आली. मात्र, रस्त्यावरील राडारोडा हटवताना मागून मोठाले दगड कोसळत राहिले. त्यामुळे हे काम आणखी जटिल झाले. रिमझिम पाऊस व अंधार पडल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. क्रेन मागवून अधांतरी असणारा जेसीबी काढल्याशिवाय रस्त्यावरील ढिगारा हलवता येणार नसल्यामुळे केळघर घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली.