महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाची अधूनमधून चांगलीच बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे तालुक्यातील दुर्गम बिरमणी गावाकडे जाणार्या पुलावर कोयना नदीचे पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला. महाबळेश्वर- कोकणाला जोडणार्या आंबेनळी घाट रस्त्यावर पोलादपूर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मलबा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे आंबेनळी घाटामधून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरु होण्यास विलंब लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच दुर्गम गावे व अंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. अंबेनळी घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्याने घाटातील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. तहसिलदार सचिन मस्के यांनी या घाटरस्त्यावरील वाहतूक अगोदरच बंद केली आहे. याचा आढावा मस्के यांनी मंगळवारी घेऊन कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांना सूचना दिल्या. याचबरोबर बिरामणी गावातील पुलावर पाणी आल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, 1 जून ते 15 जून सकाळी 8.30 वाजेपर्यंत 2394.6 मिमी (94.27 इंच) पावसाची नोंद झाली आहे . तर सोमवार सकाळी 8.30 ते मंगळवार सकाळी 8.30 अखेर 147.8 मिमी (5.81 इंच) पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वरचे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण असलेले लिंगमळा धबधबा परिसरात येणार्या जाणार्या मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. धुवाँधार पाऊस झाल्याने वनविभागामार्फत वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा सध्या तात्पुरत्या स्वरूपात पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर वेण्णालेकचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.