Land fraud file photo
सातारा

Land fraud: बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे जमीन लाटली

महाबळेश्वर तालुक्यातील प्रकार : सहा जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात बनावट कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी) तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांच्या मालकीची शेतजमीन हडप केल्याप्रकरणी इंदूर येथील महिलेने पुणे व सातारा परिसरातील सहा जणांविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आराधना संजयकुमार प्रसाद (वय 54, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विष्णु उत्तम सूर्यवंशी, पोपट बाळासाहेब गुंडगळ, आशुतोष शंकरराव कदम (रा. कात्रज, पुणे), दिपक कृष्णकांत कदम (रा. बुधवार पेठ, पुणे), रणजित विश्वासराव काळभोर व प्रितम संतोष काळभोर (रा. पाल, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराधना यांच्या वडिलांच्या मालकीची पारुट, ता. महाबळेश्वर येथील गट क्रमांक 37/1 येथे 4 हेक्टर 62 आर तसेच देवळी येथील बाबू धोंडू ढेबे यांच्या नावावर असलेली गट क्रमांक 73/1 येथील 91 आर अशी कोट्यवधी रुपयांची जमीन संशयितांनी संगनमताने हडप केली आहे. मुख्य संशयित विष्णु सूर्यवंशी याने दि. 15 जून 1998 रोजीचे खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचे उघड झाले आहे. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे त्याने दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी पोपट गुंडगळ याच्याशी खरेदीखत करून सदर जमीन बेकायदेशीररित्या विक्री केली आहे. हा संपूर्ण व्यवहार कायदेशीर भासावा यासाठी इतरांचीही मदत घेण्यात आली आहे. इतर संशयितांनी साक्षीदार व ओळखदार म्हणून सह्या केल्या आहेत.

तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित सहा जणांविरुद्ध फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार करणे व वापरणे या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT