Majhi Ladki Bahin Yojana file photo
सातारा

Ladki Bahin Yojana 3 rd Installment | लाडक्या बहिणींना प्रतीक्षा तिसऱ्या हप्त्याची

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दोन महिन्यांचे अनुदान मिळाल्यानंतर 'लाडक्या बहिणीं'ना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. यापूर्वी दि. १५ ते ३० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात तीन टप्प्यांत या अनुदानाचे वितरण झाले होते. सप्टेंबर महिना संपत आल्याने आता तिसऱ्या महिन्याच्या अनुदानाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या ८ लाखांच्या घरात गेली आहे.

राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा पात्र महिलेला १५०० रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतील काही अटी कमी करत, राज्य शासनाने ही योजना राज्य शासनाने जून महिन्यात अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात साडेपाच लाखांवर महिलांनी नोंदणी केली होती, त्यानंतर नव्या पोर्टलद्वारे आतापर्यंत अडीच लाखांवर महिलांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांची संख्या ८ लाखांच्या घरात गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहेत. यातील अनेक महिलांचे आधार सिडिंग झालेले नव्हते, त्यालाही गती देत बहुतांशी महिलांची बँक खाती आधारशी जोडली गेली असून, त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत.

सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदणीसाठी मुदत...

या योजनेसाठी अर्ज करण्याकरता दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे अजूनही या योजनेसाठी अर्ज दाखल होत आहेत. मुदतीत आलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे अनुदान दिले जाणार आहे.

बँकांनी रक्कम कपात करू नये...

ज्यांचे अनुदान जमा झाले, त्यापैकी काही महिलांच्या खात्यावरील रक्कम बँकांनी कपात करून घेतली. कोणत्याही कारणास्तव अशी रक्कम कपात करू नये, असे सक्त आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ज्या बँकांनी रक्कम कपात केली आहे, ती तत्काळ परत त्यांच्या खात्यावर जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार कपात झालेली रक्कम जमा होऊ लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT