मुंबईच्या दिशेने निघालेल्या कुसगाव येथील आंदोलकांनी नीरा नदीच्या पुलावर दंडवत घालत आंदोलन केले. Pudhari Photo
सातारा

Satara News | कुसगावच्या आंदोलकांचा नीरा नदी पुलावर दंडवत

तिसर्‍या दिवशीही आंदोलन सुरूच : तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाई : मुंबईच्या दिशेने निघालेल्या कुसगाव, ता. वाई येथील आंदोलकांनी नीरा नदीच्या पुलावर दंडवत घालत अनोखे आंदोलन केले. बेकायदेशीर क्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मुंबईच्या दिशेने सुरूच राहणार असा निर्धार कुसगाव, एकसर, बोरीव गावच्या ग्रामस्थांनी केला. दरम्यान, आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी केली.

कुसगाव या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू करण्यात आलेला स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला लाँग मार्च रोखण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी शनिवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. जोपर्यंत दगडखाण व क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही लाँग मार्च थांबवणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडली.

तहसीलदारांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला व जिल्हाधिकारी घरगुती अडचणींमुळे सोमवारपर्यंत रजेवर असल्यामुळे आपण आंदोलन थांबवावे. आपण सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून यावर मार्ग काढू व तोपर्यंत क्रशरच्या ठिकाणी सुरू असणार्‍या सर्व प्रक्रिया थांबवते व हे सर्व तुम्हाला लिखित स्वरूपात देते, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. त्यावर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची बैठक होईपर्यंत क्रेशरमधील ब्लास्टिंग उत्खनन व कृषी त्याचबरोबर वाहतूक थांबवण्याचे लेखी पत्र द्यावे. आम्ही हे आंदोलन स्थगित करतो, अशी भूमिका घेतली. परंतु लेखी आश्वासन न मिळाल्याने मुंबईच्या दिशेने लाँग मार्च सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. आंदोलकांनी त्यानंतर नीरा नदीच्या पुलावर दंडवत घालत आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT