सातारा : वर्गीय धराच्या दृष्टीने आणि जातीला, जातीव्यवस्थेने ठरवून दिलेले काम म्हणून पाहिले तर या 1884 च्या गॅझेटियर्समध्ये 95 टक्केपेक्षा जास्त कुणबी एकतर स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाची राबणूक करून शेती करत होते.जमीनदार हे प्रामुख्याने ब्राह्मण जातीतले होते आणि थोड्या प्रमाणात, स्वतःला मराठा समजणारे कुणबी होते असे स्पष्ट होते. तसे ‘कुणबावा’ करणारी जात म्हणून त्यांच्यात आणि धनगर व माळी जातीत फार मोठे साम्य होते, असेही नमूद केलेले आहे. यामुळेच कुणब्यांनी सर्व बलुतेदारांना घेऊन अनेक संप आणि संघर्ष केल्याची माहिती धरणग्रस्तांचे नेते, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व मराठा आरक्षण लढ्यातील अभ्यासक डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा म्हणजेच कुणबी असल्याची अभ्यासपूर्ण मांडणी करताना डॉ. पाटणकर यांनी म्हटले आहे की, एका प्रथेचा गॅझेटियरमध्ये असलेला उल्लेख कुणबी आणि महार या जातींमधील नोंद घेण्यासारखा जवळचा संबंध दाखवतो. वर ज्यावेळी वधूच्या घरी जायला निघतो त्यावेळी महार व्यक्ती वराला अडवते आणि त्या व्यक्तीला फेटा आणि उपरणे दयावे लागते. त्याचबरोबर हा कुणबी वर ज्यावेळी वधुच्या घरासमोर पोहोचतो तेव्हा महार स्त्री त्याला ओवाळते आणि ‘ईडा पीडा जावो बळीचे राज्य येवो’ असे म्हणते. याचा अर्थ काही विशेष संबंधांचा इतिहास सूचित होतो एवढाच आहे. महार जात ही कुणब्यांपेक्षा, जातीय उतरंडीमध्ये बर्याच खालची समजली जाणारी आणि अस्पृश्य म्हणून वागवली जाणारी व वेठबिगार लादली गेलेली जात होती. हे सत्य काही यामुळे पुसले जात नाही. पण ‘महार’ मधून ‘महाराष्ट्र’ आणि ‘महार’ व ‘मराठे’ हे सामाजिक वास्तव निर्माण झाल्याची प्रक्रियाही नाकारता येत नाही.
डॉ. पाटणकर यांनी पुढे सांगितले की, ब्रिटीशांनी त्यांच्या देशातल्या भांडवलशाहीशी सुसंगत रेल्वे आणि कारखाने भारतात आणल्यानंतर खेड्यापाड्यांमधून मुंबईसारख्या औदयोगिक शहरात गेलेल्या जातींमध्ये पहिली जात ही महार (आणि त्याबरोबरीने मांग) दिसते तर त्यापाठोपाठ स्वतःला मराठा समजू लागलेले आणि न समजू लागलेले कुणबी जातीचे आणि घनगर जातीचे लोक लाखांच्या घरात ओझी उचलून, गिरण्यांमध्ये कामे करून जगण्यासाठी मुंबईला गेलेले दिसतात. कारण शेतीच्या उद्ध्वस्ततेला वेगळ्या प्रकारे सुरुवात झालेली दिसते. अण्णाभाऊ साठेंच्या मुंबईच्या लावणीत वर्णन केल्याप्रमाणे ‘मैना’ गावाकडे ठेवून कुणबी (मराठा) लाखोंच्या संख्येने मुंबईला राहिला.
1982-83 च्या गिरण्यांच्या संपानंतर तो असंघटित क्षेत्रात ओझी उचलण्याची, टेबलं पुसण्याची, काँट्रॅक्टमध्ये सिक्युरिटी गार्ड वगैरे कामे करण्यात फेकला गेला. आज हा कुणबी (मराठा) मुंबईला ही अंगमेहनती कामे करतो आणि गावाकडे वंजारी दुष्काळग्रस्तांच्या साथीने ऊस तोडणी मजूर म्हणून काम करतो. मध्यम गरीब शेतकरी म्हणून कर्जबाजारी जीवन जगतो. कुठे आत्महत्येचा मार्ग शोधतो तर कुठे लढून न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करतो, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी म्हटले आहे.
प्रकल्पांना दिल्यामुळे जमीन संपत चालली
पूर्वी आणि आजही मूठभर धनदांडग्या कुणबी (मराठा) कुटुंबांच्या वर्चस्वाखाली हा कुणबी कष्टकरी समाज पिळला जातो, नाडला जातो. उद्ध्वस्त केला जातो. गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने जमीन संपादन करून प्रकल्पांना देण्याच्या प्रक्रियेत यांची जमीन संपत चालली आहे आणि याच प्रक्रियेतून मूठभर कुणबी (मराठा) कुटुंबे साखर सम्राट, शिक्षण सम्राट आणि सत्ता सम्राट झाली आहेत. भांडवलदार झाली आहेत. त्यांचे कुणबी (मराठा) पण पूर्णपणे संपले आहे. 95 टक्क्यांपेक्षा जास्त कुणबी (मराठा) जास्तीत जास्त बेरोजगार, भूमिहीन, अल्पभूधारक, अंगमेहनती असंघटित मजूर असे जीवन जगण्याच्या कोंडीत सापडले आहेत. उचभ्रू, धनदांडगे कुणबी (मराठा) या 95 टक्के कुणबी जातीच्या (मराठा) लोकांशी बेटी व्यवहार करत नाहीत.