कोरेगाव : गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कोरेगाव तालुका हिरवागार होणार असून, अवघ्या १३ महिन्यांत भाडळे आणि नलवडेवाडी खोर्यात कृष्णामाईचे पाणी खळखळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वत: जलपूजनाला येणार आहे, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.
जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या भाडळे उपसा जलसिंचन योजना, नलवडेवाडी उपसा जलसिंचन योजना आणि चिलेवाडी-रेडेघाट ते कोरेगाव या प्रमुख जिल्हा मार्गाचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, विक्रम पावस्कर, रामकृष्ण वेताळ, सोळशी येथील सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज, सातारा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आ. रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले, कोरेगाव तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरुपी हटवण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यांनी या भागाचा पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न सोडवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने शेतकर्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव तालुक्याचा पाणी प्रश्न खर्याअर्थाने सोडवला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच. २०१४ मध्ये त्यांनी जाखणगाव येथे येऊन गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कामाला गती दिली. तब्बल २२०० कोटी निधी उपलब्ध करून दिला.
डॉ. सौ. प्रिया शिंदे म्हणाल्या, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आ. महेश शिंदे यांनी भाडळे भागाचा दुष्काळ कायमस्वरुपी मिटवायचा होता, तसे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. सुनील खत्री यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रदीप कदम यांनी केले. आभार भरत मुळे यांनी मानले.