वाई : वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. बलकवडी व धोम धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून बलकवडी धरणातून 1700 क्युसेक पाणी धोम धरणात सोडण्यात येत आहे. धोम धरणात जांभळीसह 7.5 हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने शनिवारी सकाळी बारा वाजता धोम धरणातून एक हजार 500 क्युसेक पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीत असणार्या झोपड्या जलपर्णीसह वाहून गेल्या आहेत. नदीत राहणार्या लोकांचे सिद्धेश्वर मंदिरात स्थलांतर केले आहे.
वाईच्या महागणपती मंदिराच्या सभामंडपात कृष्णामाईने प्रवेश केला असून चरण स्पर्शाकडे निघाली आहे. बलकवडी धरणातून सध्या धोम धरणात 1700 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात 673 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खंडाळा तालुक्याला दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कालव्यातून करण्यात येत आहे. तर विद्युत गृहातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे.
वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने वाई तालुक्यातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धोम धरणाची पातळी 747 मीटर असून 13.3 टीएमसीचे हे धरण आहे, सध्या धरणात पाच हजार 500 क्युसेक पाण्याची आवक असून त्यातून एक हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू केला आहे. धरणाचे दोन दरवाजे दोन फुटांपर्यंत उघडले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीला पूर आला असून हा पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. धोम पाटबंधारे विभागाकडून काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धोम-बलकवडी धरणावर जवळ पास पाच तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने या सर्व तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला होता. बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन घट निर्माण झाली होती, नागेवाडी धरणक्षेत्रात सुद्धा समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तेही धरण दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याच्या शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे.