Koyna dam 
सातारा

Koyna Rainfall: ६५ वर्षात कोयना विभागातील पाऊस बदलला

निसर्ग, पर्यावरण व ग्लोबल वॉमिंगचा अभ्यास गरजेचा; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गरजेचे

पुढारी वृत्तसेवा
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : कोयना परिसरात सन १९६१ ते २०२६ या ६५ वर्षांच्या कालखंडात पावसाचे अनेक चढउतार पहायला मिळाले आहेत. कधी महाकाय पावसामुळे महापूर, ओला दुष्काळ तर कधी पाण्याअभावी झालेले हालही अनुभवले आहेत. कोयना धरण निर्मितीनंतर पाणी अडविण्याचे फार मोठे काम झाल्याने यातून राज्याला सिंचनासह वीजही मिळाली, परिणामी दरवर्षी पडणारा एकूण पाऊस व अलिकडच्या काळात कमी कालावधीतील विक्रमी पाऊस व ग्लोबल वॉर्मिंगचे धोके लक्षात घेता याबाबत पर्यावरण रक्षणावर अधिकाधिक भर देणे ही भविष्याची नितांत गरज असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

कोयना विभागात कोयना ते महाबळेश्वर (तापोळा) या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात पडणार्‍या पावसावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राच्या वीजेसह सिंचन व कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील सिंचनाची गरज अवलंबून असते. सन १९६१ ते २०२६ या ६५ वर्षांच्या कालखंडात अनेकदा कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पावसाचे प्रमाण अनपेक्षितपणे बदलत असल्याचेही समोर आले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम लक्षात घेता अलीकडच्या काळात येथे कोणत्याही हंगामात पाऊस पडत असतो.

सन २०२१ च्या जुलै महिन्यात याच धरणांतर्गत विभागात मागील शंभर वर्षांचे विक्रम मोडीत काढणारा कमी काळातील सर्वाधिक पाऊस झाला. या पावसामुळे धरणाच्या आजूबाजूला असलेल्या सह्याद्री पठारासह स्थानिक अनेक छोटे, मोठे डोंगर दुभंगल्याने मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर तांबडी माती तथा गाळही आल्याने महिनोन्महिने गढूळ पाणी धरण व पुर्वेकडील विभागात पहायला मिळाले. यातूनच कधीही न भरून येणारी नैसर्गिक, सार्वजनिक व वैयक्तिक हानीही झाली.

सन १९६१ ते १९७० या दहा वर्षात येथे सर्वाधिक ८२०६ मि.मी.तर सर्वात कमी ३३३६ मि. मी.पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर ७१ ते ८० च्या दशकात सर्वाधिक ६३४७ मि.मी.तर सर्वात कमी ३२३१ मि.मी. ८१ ते ९० दशकात सर्वाधिक ६०२३ व कमी ३६१८ मि.मी. तर ९१ ते २००० सालापर्यंत सर्वाधिक ७९९४ व कमी ३६५३ मि.मी.२००१ ते २०१० मध्ये सर्वाधिक २००६ साली नवजा येथे उच्चांकी ८३३० मि. मी. तर २००३ मध्ये सर्वात निच्यांकी कोयना येथे २५५२ मि.मी. ची नोंद झाली. २०११ ते २०२५ पर्यंत सर्वाधिक ८४२० मि. मी.व सर्वात कमी २७७१ मि. मी.पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी अल निनोचा धोका व हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असतानाही आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला असून आता धरणात अपेक्षित पाणीसाठा झाल्यानंतर पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पूर्वेकडे विनावापर पाणी सोडण्यात येत आहे. निसर्गाचा समतोल प्रत्येकवेळी बदलल्याचे स्पष्ट पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत येथे पुर्वीच्या तुलनेत पाऊसमान कमी होत असल्याचेही निदर्शनास येत असून पाऊस उशिरा सुरू होऊन अल्पावधीतच जास्त व विनाशकारी पडत असल्याचीही आकडेवारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT