Koyna Hydroelectric Project 
सातारा

Koyna Hydroelectric Project: दोन महिन्यांत १६३ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती

पूर्व, पश्चिम प्रकल्पात दोन महिन्यांत केवळ १७० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

पुढारी वृत्तसेवा
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला यावेळी मे महिन्यासह एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक जलवर्षाच्या सुरुवातीच्या दोन्ही महिन्यात पाण्याअभावी फार मोठा तोटा सहन करावा लागला. यातूनच या दोन महिन्यात केवळ ४.८७ टीएमसी पाण्यावर १७०.०६० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल १६३.३७० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाल्याने राज्य महसुलाचा कोट्यावधींचा तोटा झाला आहे.

धरणात आता अपेक्षित पाणीसाठा झाल्यामुळे आगामी काळातील वीजनिर्मितीची चिंता मिटली आहे. सध्या धरणातून पूर्वेकडे विनावापर पाणी सोडण्यात येत असल्याने दोन महिन्यांतील वीजेची तुट भरून काढायची असेल वाया जाणार्‍या अतिरिक्त पाण्याचा सकारात्मक वापर सहजशक्य असल्याचे या तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यासाठी शासकीय व प्रशासकीय सकारात्मकता महत्त्वाचे आहे अन्यथा हेच विनावापर सोडलेले पाणी पुर, महापुरातून स्थानिकांच्या मुळावर उठल्याने यातून पुन्हा कोट्यावधींची नुकसान भरपाई देण्याची वेळ शासनावर येणार असल्याने या गोष्टींचा सकारात्मक विचार गरजेचा आहे.

या जल वर्षांत आत्तापर्यंतच्या दोन महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे ३.४१ टीएमसी पाण्यावर १६५.५७३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी ६.५४ टीएमसी वर ३०६.११७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे ३.१३ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने १४०.५४४ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी सुरुवातीला सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देण्यात आले, यासाठी सोडलेल्या १.३१ व पूरकाळात ०.१५ अशा १.४६ टीएमसी पाण्यावर ४.४८७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

गतवर्षी लवकरच पाऊस सुरू झाल्याने सिंचनासाठी त्या काळात पाणी सोडण्यात आले नव्हते परंतु पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सोडलेल्या ६.०२ टीएमसी पाण्यावर २७.३१४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी ४.५६ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने २२.८२६ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता या जलवर्षात आत्तापर्यंत एकूण केवळ ४.८७ टीएमसी पाण्यावर १७०.०६० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी १२.५६ टीएमसी पाण्यावर ३३३.४३० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत ७.६९ टिएमसी पाणीवापर कमी झाल्याने १६३.३७० दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT