पाटण : पाटण तालुक्यातील पाटण कोयना महामार्गावर वाजेगाव नजीकचा पर्यायी रस्ता वाहून गेल्याने त्या ठिकाणची जड वाहनांसाठीची वाहतूक अद्यापही बंदच ठेवण्यात आलेली आहे. केवळ हलक्या वाहनांनाच येथून वाहतुकीस परवानगी असून 27 जूनपर्यंत जड वाहनांना येथे वाहतूक करता येणार नाही. त्यांच्यासाठी कराड ते मलकापूर, आंबा घाट, संगमेश्वर मार्गे चिपळूण अशी वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पाटण-कोयना या राष्ट्रीय महामार्ग 166 च्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे 16 जून रोजी वाजेगाव येथील पर्यायी मार्ग वाहून गेल्याने लगतच असलेल्या पुलावर दुरुस्तीचे काम करण्यात आले असून या ठिकाणाहून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली आहे. अद्यापही पावसाचे प्रमाण जादा असून अपेक्षित काम होत नसल्याने येथे अद्याप अवजड वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी नाही.
साधारणपणे 27 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठीचा कालावधी लागणार असल्याने या महामार्गावर नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी 27 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सध्या उंब्रज, कराड येथून चिपळूणकडे जाणार्या अवजड वाहनांसाठी कराड, पाचवड फाटा, उंडाळे, कोकरूड, मलकापूर, आंबा घाट, संगमेश्वरकडून चिपळूण असा वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती एका अध्यादेशाद्वारे जिल्हा पोलिस प्रमुख तुषार जोशी यांनी दिली आहे.