Koyna Dam Pudhari
सातारा

Koyna Dam: अनाठायी भीती अन्‌ अपप्रचार नको

कोयना धरण भरण्याचा विश्वास; गत जलवर्षात सिंचन व वीजनिर्मितीचा पूर्ण कोटा पाणीवापर

पुढारी वृत्तसेवा
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : पावसाने ओढ दिल्यामुळे सिंचन व औद्योगिक विजेसाठी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी अशा नकारात्मकते सोबतच मागील जलवर्षात धरणातील पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर झाल्याने चालू जलवर्षात धरणात अधिकचा पाणीसाठा साठवला जाऊ शकतो. त्यामुळे पूर, महापुराची तीव्रता कमी होऊ शकते, याचाही सकारात्मक विचार आवश्यक आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा हा आगामी काळातील पिण्याच्या पाण्यासाठी जास्तीत जास्त काळ पुरेसा आहे. त्यामुळे कोयना धरणाबाबत अफवा, नकारात्मकता याहीपेक्षा या पाण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मत जलतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 13.84 टीए तर उपयुक्त 8.72 टीएमसी इतका आहे. सध्या पश्चिमेकडील अपवाद वगळता बहुतांश जलविद्युत निर्मिती बंद असली तरी आतापर्यंत पश्चिमेकडे 0.56 टीएमसी तर पूर्वेकडे सिंचनासाठी 1.21 अशा एकूण 1.77 टीएमसी पाण्यावर आत्तापर्यंत 27.404 दशलक्ष वीजनिर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय एक जून पासून आत्तापर्यंत कोयना 23 मिलिमीटर, नवजा 79 मिलिमीटर तर महाबळेश्वर 26 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी भलेही पंधरा मे पासून पाऊस सुरू झाला असला तरी 22 जून पर्यंत कोयना 57 मिलिमीटर, नवजा 34 मिलिमीटर, महाबळेश्वर 59 मिलीमीटर इतक्याचं पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे या दोन्ही वर्षांची आतापर्यंतच्या पावसाची तुलना केली तर निश्चितच अद्यापही भीतीचे कारण नाही हे या तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याशिवाय जिल्हा अथवा पश्चिम महाराष्ट्रातील अन्य धरणांच्या एकूण पाणीसाठ्याची तुलना केली तर धरणात सध्या या आपत्कालीन परिस्थितीत असणारा पाणीसाठा हा इतर धरणांच्या एकूण क्षमतेपेक्षा जास्त आहे.

मागील जलवर्षात धरणातील आरक्षित मग ते जलविद्युत निर्मिती असो अथवा सिंचनासाठी पूर्णपणे पाणीवापर झाला ही समाधानाची बाब आहे. याशिवाय जर पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणात जादा पाणी असेल तर पावसाळा सुरू होताच पूर्वेकडे पूर, महापूर व यातूनच अब्जावधींची सार्वजनिक व वैयक्तिक मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्यामुळे चालू जलवर्षात पूर, महापूर संभाव्य नुकसानीची शक्यता कमी आहे.

त्यामुळे कोयनेतील पाण्याबाबत काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून सकारात्मक उपाययोजना अंमलबजावणी सुरू आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी व पावसाळ्यात पाण्यामुळे याच प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते व आपल्या सर्वांच्या शेती, पिण्याचे पाणी व वैयक्तिक संरक्षणाची जबाबदारीही याच मंडळींवर असते. त्यामुळे त्यांच्या कारभाराविषयी नकारात्मकता पसरवण्याऐवजी त्यांच्या या धाडसी निर्णय अंमलबजावणीमध्ये सर्वसामान्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर त्यांच्या मानसिकतेलाही चांगले बळ मिळेल, असे प्रयत्नही गरजेचे आहेत. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT