पाटण; गणेशचंद्र पिसाळ : दरवर्षी पावसाळ्यात सरासरी पन्नास तर कित्येकदा एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षाही ज्यादा पाणी विनावापर सोडून देणार्या कोयना धरणावर सध्या अपुर्या पाणीसाठ्यामुळे सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी एक एक थेंब पाण्याचा व जलपातळी व पाणीउंचीत अगदी एक एक इंचाचा विचार करून काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे. ही काटकसर व काटेकोर नियोजनात जलसंपदासह ऊर्जा विभागाचा अक्षरशा घामटा निघत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत संबंधित विभागांचा समन्वय व नियोजन हे निश्चितच राज्याच्या पथ्यावर पडत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. धरणातील पाण्याच्या अखेरच्या थेंबापर्यंतचे सार्वत्रिक नियोजन लक्षात घेता जलसंपदा व ऊर्जा विभागाची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या कोयना धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठा 12.08 टीएमसी इतका आहे यापैकी मृत पाच टीएमसी साठा वगळता धरणात उपयुक्त केवळ 7.08 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यावरच अपेक्षित पाऊस पडेपर्यंत सिंचन व वीजनिर्मितीची सार्वत्रिक भिस्त आहे. सध्या पूर्वेकडे सिंचनासाठी तर पश्चिमेकडे जलविद्युत निर्मितीसाठी प्रचंड मर्यादा आल्या असल्याने सिंचनासाठी पूर्वेकडे केवळ धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1050 क्यूसेक इतकेच पाणी सोडण्यात येत आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पांसाठीही अत्यल्प पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची जलपातळी 618 मीटरला गेल्यानंतर तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा टप्पा बंद पडतो सध्या ही जलपातळी 619.785 मीटर इतकी आहे.
अद्यापही 1.785 मीटर पाणी पातळी असेपर्यंत कोयना चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती सुरू राहील. एकूणच महाकाय पाणी साठवन क्षमता व त्याचपटीत विनावापर सोडण्यात शेकडो टीएमसी पाणी सोडणार्या याच कोयना धरणावर सध्या अक्षरशः एक एक थेंब पाण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची वेळ आली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा व जलपातळी व पाणी उंचीच्या प्रत्येक इंचाचा विचार करून त्यानुसारच सिंचन व जलविद्युत निर्मितीचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत असली तरी ते यात यशस्वी होताहेत ही समाधानाची बाब आहे.
पाणीसाठा 12.08 टीएमसी , 11.47 टक्के
उपयुक्त पाणीसाठा 7.08 टीएमसी
पाणी उंची 2033.5 फूट
जलपातळी 619.785 मीटर
सिंचनासाठी धरण पायथा वीजगृहातून 1050 क्यूसेक विसर्ग
एक जूनपासूनचा एकूण पाऊस – कोयना – 41 मि. मी., नवजा – 45 मि. मी., महाबळेश्वर – 75 मि. मी.
पावसाळ्यात पाण्यामुळे तर उन्हाळ्यात पाण्यासाठी जलसंपदा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात एका बाजूला धरणात पाणी साठवताना दुसरीकडे पूर्वेकडे पाणी सोडताना पूर, महापूर त्यातून होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. नैसर्गिक , तांत्रिक, प्रशासकीय, शासकीय या सर्व गोष्टींचा सामना करताना सामान्यांचा सार्वत्रिक विचार करावा लागतो. उन्हाळ्यात सिंचन, वीजनिर्मितीसाठी काटकसरीने पाणी वापर करावा लागतो; मात्र पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी जनसामान्यांसह मान्यवर नेतेही आव्हानात्मक परिस्थितीत अनेकदा संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांवर खापर फोडतात. जलसंपदा विभागाला प्रोत्साहन देणे गरजेचे असतानाही त्यांची अवहेलनाच होते, ही दुर्दैवाची बाब आहे.