Koyna Dam 
सातारा

Koyna Dam: कोयना धरणातील गाळाबाबतचा प्रचार अनाठाई

धरणात अत्यल्प गाळ असल्याचा जलतज्ज्ञासह माजी अधिकाऱ्यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : महाराष्ट्राची वरदायीनी तब्बल १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात मागील अनेक वर्षात मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याच्या शंका सातत्याने निर्माण केल्या जातात. मध्यंतरी याच गाळाचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर येथे ५ टीएमसी मृतसाठा पकडला जात असतानाही प्रत्यक्षात केवळ ०.०३ टक्के इतकाच गाळ असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. सध्या धरणात अत्यल्प पाणीसाठा व बहुतांश जलाशय कोरडा पडल्याने याच गाळाविषयी अनाठाई भीती पसरवली जात आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही.

कोयना धरणाचे अभ्यासक व माजी वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोयनेत गाळाचे प्रमाण अत्यल्प असून दरवर्षी येणारा गाळ त्याच पटीत पाण्यावाटे बाहेर जात असतो. धरण पाणी साठवण सर्वेक्षणावेळी उपलब्ध असलेली उपकरणे प्राथमिक आणि साध्या तंत्राची होती, परंतु त्यामुळे सर्वेक्षणात चूक असेल असा निष्कर्ष निघत नाही. हल्ली नवीन तंत्रज्ञान वापरून धरणाच्या साठवण क्षमतेचा अभ्यास करण्यात येतो. यात एका बोटीच्या तळाला श्राव्यातील ध्वनीलहरी (अल्ट्रासाउंड वेव्हज् ) सोडणारा ट्रान्समीटर बसवून जलाशयाच्या तळावरून परावर्तित होऊन येणाऱ्या ध्वनीलहरी नोंदवल्या जातात.

बोटीपासून जलाशयाच्या तळापर्यंत आणि तिथून परत बोटीकडे ध्वनीच्या पाण्यातील प्रवासासाठी लागणारा वेळ यावरून नोंदविता येतो. त्यावरून त्या त्या ठिकाणची पाण्याची खोली किती याची नोंद अचूकपणे घेता येते. मागील काही वर्षांपासून बदललेल्या पर्जन्यामुळे अनेकवेळा अतिवृष्टी होते, विशेषतः जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टी झाली तर अशावेळी जलाशयात कमी पाणी असते आणि बुडीत क्षेत्राचा बराचसा भाग हा धूप होण्यासाठी अनाच्छादित असतो. अशावेळी भुस्खलन आणि जमिनीची धूप त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण होऊन तो जलाशयात साठला जातो. सर्वसाधारणपणे शंभर वर्षात किती गाळ येईल याच्या ठोकताळ्यानुसार जलाशय व त्याखालील जलसाठा हा मृतसाठा म्हणून गणला जातो.

कोयना धरणात बऱ्याचवेळा पावसात येणारा गाळ हा सांडव्यावरून जाणाऱ्या विसर्गातून वाहून जातो. याशिवाय कोयना धरण पायथा वीज गृहातून धरण भिंतीच्या खालच्या बाजूने वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावाटेही हा गाळ वाहून जातो. उर्वरित खाली साठणारा गाळ हा केवळ मृतसाठ्यातच न साठता सर्वच बुडीत क्षेत्रात साठू शकतो. धरणाच्या आपत्कालीन (विमोचक) दरवाजातून बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या वेगाबरोबरही हा गाळ वाहून जातो. त्यामुळे कोयना धरणातील गाळाबाबत भीती बाळगण्याची गरजच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT