पाटण : कोयना धरणाचे तांत्रिक जलवर्ष संपायला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. 1 जूनपासून सुरू होणार्या नव्या तांत्रिक जलवर्षात कोयना धरणात सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. यावर्षी मे महिन्यात पडलेला पाऊस आणि हवामान खात्याने वर्तवलेला सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज, यामुळे धरणात जास्त पाणीसाठा राहण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात महापुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.
या तांत्रिक जलवर्षात कोयना धरणात 186.46 टीएमसी पाण्याची आवक झाली. लवादानुसार, पश्चिम विद्युत निर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. आतापर्यंत यापैकी 66.70 टीएमसी पाणी वापरले गेले आहे. आरक्षित पाणीसाठा 0.80 टीएमसी शिल्लक असला तरी, प्रशासनाने यापूर्वीच अतिरिक्त 4 टीएमसी पाणी वापरास मान्यता दिली आहे.
सिंचनासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाणी वापरले गेले. 28.44 टीएमसी पाणी पायथा विद्युतगृहाद्वारे वीजनिर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात आले. आपत्कालीन विमोचक दरवाज्यातून 8.85 टीएमसी पाणी, तर पूरकाळात 9.10 टीएमसी पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले. याशिवाय, पावसाळ्यात धरणाचे सहा वक्री दरवाजे तथा सांडव्यातून 59.30 टीएमसी पाणी विनावापर सोडण्यात आले.
यावर्षी कोयना जलविद्युत प्रकल्पातून 3201.365 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. मे महिन्यात पूर्वेकडील सिंचनाची मागणी घटल्याने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात 24.16 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यापैकी 19.04 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. नव्या जलवर्षाच्या सुरुवातीलाच धरणात जास्त पाणीसाठा राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. पश्चिमेकडे अतिरिक्त वीजनिर्मिती करणे किंवा अन्य पर्यायांचा विचार करणे हितावह ठरू शकते.
कोयना धरणात आत्तापर्यंत186 टीएमसी आवक तर 180 टीएमसी जावक कोयना धरणात एक जून 2024 पासून सुरू झालेल्या तांत्रिक जलवर्षाची सुरुवात 18.80 टीएमसीवर झाली. आत्तापर्यंत कोयना येथे 5788, नवजा 6862, महाबळेश्वर 6647 मिलिमीटर पाऊस पडला. यातून तब्बल 186.46 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आत्तापर्यंत पश्चिम वीजनिर्मिती, सिंचन, विनावापर, आपत्कालीन विमोचक दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी, लिकेज, बाष्पीभवन अशातून तब्बल 180.17 टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात 24.16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.