पाटण : कोयना धरणांतर्गत जलाशयात यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला असला तरी तुलनात्मक ज्यादा पाण्याची आवक व मुबलक पाणीसाठा असल्याची समाधानकारक परिस्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तब्बल 50.986 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.
या जल वर्षातील सात महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 22.47 टीएमसी पाण्यावर 1041.454 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी 24.66 टीएमसी वर 1139.549 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 2.19 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 98.095 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.
पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी आत्तापर्यंत सिंचनासाठी 7.38 टीएमसी पाणी सोडण्यात आले. याशिवाय धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पूरकाळात सोडलेल्या 14.53 टीएमसी अशा एकूण 21.91 टीएमसी पाण्यावर 107.090 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 3.38 व पूरकाळातील 9.10 अशा एकूण 12.48 टीएमसी पाण्यावर 59.981 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 9.43 टीएमसी पाणीवापर जादा झाल्याने 47.109 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता या सात महिन्यात एकूण 44.38 टीएमसी पाण्यावर 1148.544 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 37.14 टीएमसी पाण्यावर 1139.549 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत 7.24 टीएमसी पाणीवापर जादा झाला असला तरी 50.986 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. यावर्षी पश्चिमेकडे कमी आणि पूर्वेकडे जादा पाणीवापर झाल्यानेच वीजनिर्मितीत गतवर्षीच्या तुलनेत ही जादा तूट पहायला मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला असला तरी ज्यादा पाण्याची आवक व मुबलक पाणीसाठा असल्याची समाधानकारक परिस्थिती आहे. कोयना धरणात यावर्षी पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची मात्र चिंता मिटली आहे.