पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचावरून अर्ध्यां फुटाने कमी करत 1 फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 11 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाच्या मध्यम सरी कोसळत आहेत. त्यातच 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्या धरणाच्या शिवसागर जलाशयात 103.52 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 1.73 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्यस्थितीत धरणाची पाणीसाठवण क्षमता संपुष्टात येत असून सुरू असणार्या पावसामुळे धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून कोयना नदीत विसर्ग केला जात आहे.
धरणात प्रतिसेकंद सरासरी 14 हजार 295 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर व धरणात येणार्या पाण्याची आवक घटल्याने शुक्रवारी सायंकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटावरून एक फूट इतके करण्यात आले आहेत. या दरवाजातून 9 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून 2 हजार 100 असे प्रतिसेकंद 11 हजार 200 क्युसेक पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.