पाटण : कोयना धरणांतर्गत जलाशयासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 49,455 क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 83.05 टीएमसी झाला आहे. आगामी काळातील पाऊस व धरणाची संपुष्टात येत असलेली पाणी साठवण क्षमता लक्षात घेता शनिवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे पहिल्यांदा चार फुटांनी तर संध्याकाळी पाच फुटांनी वर उचलण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून विनावापर प्रतिसेकंद 20,900 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण 23 हजार क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
धरणातून सोडण्यात आलेले पाणी व पूर्वेकडील विभागात पडणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत धोकादायक वाढ झाल्याने नदीकाठची गावे व लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान,पाण्याची आवक वाढतच असल्याने रविवारी सकाळी पुन्हा जादा पाणी सोडण्याच्या शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आल्या आहेत.
यावर्षी पंधरा जुलै पासूनच कोयना धरणाच्या दरवाजातून साडेतीन फुटांनी पाणी सोडण्यात येत होते. दोनच दिवसांपूर्वी पाऊस कमी झाल्याने धरणाचे दरवाजे बंद करून केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पाणी सोडण्यात येत होते. मात्र पुन्हा अचानक पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सकाळी धरणाचे दरवाजे चार फुटांनी वर उचलून 16,565 क्युसेक विसर्ग करण्यात आला होता.
मात्र धरणात वाढती पाणी आवक लक्षात घेता पुन्हा संध्याकाळी साडेपाच वाजता हेच दरवाजे पाच फूट वर उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून प्रतिसेकंद 20,900 व पायथा वीज गृहातील वीस मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे चाळीस मेगॅवॅट वीजनिर्मिती करून 2,100 असे प्रतिसेकंद एकूण 23,000 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान पूर्वेकडील विभागातही सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत मुळातच वाढ झाली आहे. आता धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या धोका पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्यानुसार जास्त पाणी सोडण्याचा विचार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच ते शनिवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात धरणातील पाणी उंची 4.1 फुटांनी तर पाणीसाठ्यात 3.64 टीएमसीने वाढ झाली आहे. याच चोवीस तासातील व एक जून पासून पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 154 (2817) मिलिमीटर, नवजा 202 (3034) मिलिमीटर महाबळेश्वर 261 (3073) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान नवजा व महाबळेश्वरमध्ये पावसाने आपला तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 78.05 टीएमसी, पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2144.7 फुट तर जलपातळी 653.699 मीटर इतकी झाली आहे.