सातारा

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर

पाऊस वाढल्यास होणार जादा विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे शुक्रवारी सायंकाळी १ फुटावरून २ फुटांपर्यंत उचलण्यात आले होते; मात्र त्यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने धरणाचे वक्र दरवाजे पुन्हा एक फुटाने उचलून रात्री १० वाजता ३ फूट करण्यात आले. त्यामुळे कोयना नदीत १७ हजार ५८५ क्युसेक विसर्ग सुरू असून कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून पावसाचा जोर वाढल्यास वक्र दरवाजातून आणखी जादा पाणी सोडले जाणार आहे.

शुक्रवार सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे १९१ मिलिमीटर, नवजात २६८ मिलिमीटर, तर महाबळेश्वरमध्ये ३४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सायंकाळी कोयना धरणाचे सर्व ६ वक्र दरवाजे १ फुटाने उचलून कोयना नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला होता; मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता धरणाचे वक्र दरवाजे १ फुटावरून २ फुटांपर्यंत उचलण्यात आले होते.

त्यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याचे लक्षात घेत रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून ३ फूट करण्यात आले. पायथा वीजगृहातून बुधवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी कोयना धरणात सरासरी ५९,१९४ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.

त्यावेळी धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरमध्ये ८७.८३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ १७.४२ टीएमसी पाण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT