पाटण : कोयना धरणांतर्गत जलाशयासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 50,945 क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 85.29 टीएमसी झाला आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे दरवाजे पाच फुटावरून साडेसहा फूट वर उचललेले आहेत.
धरणाच्या दरवाजातून विनावापर 29,646 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण 31,746 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले आहे. यामळे नदीकाठची गावं व लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पाटण शहरानजीकचा मुळगाव पूल पाण्याखाली गेल्याने त्या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याशिवाय स्थानिक छोटे पूल, फरशा पाण्याखाली जाण्याच्या शक्यता असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना, सुरक्षा यंत्रणा सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.
कोयना धरण शिवसागर जलाशयात कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही विभागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी पाच वाजता धरणाचे दरवाजे साडेपाच फूट वर उचलले आहेत. या दरम्यान पूर्वेकडील विभागातही सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत मुळातच वाढ झाली आहे. आता धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या धोका पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
दरम्यान, धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्यानुसार जास्त पाणी सोडण्याचा विचार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनानेे दिली आहे. शनिवारी संध्याकाळी पाच ते रविवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 4.40 टीएमसीने वाढ झाली आहे. याच चोवीस तासातील व एक जूनपासून पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 92 (2909) मिलिमीटर, नवजा 131 (3165) मिलिमीटर, महाबळेश्वर 181 (3254) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 80.29 टीएमसी, पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2147.7 फुट तर जलपातळी 654.431 मीटर इतकी झाली आहे.