पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या व मध्यम सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या शिवसागर जलाशयातील साठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता धरणात 79.41 टीएमसी इतके पाणीसाठा झाला होता. त्याचवेळी धरणात प्रतिसेकंद 25 हजार 279 क्युसेक पाण्याची आवक होत होती.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आता 79.41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण 75.45 टक्के भरले असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 25.84 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. 15 जुलैला उघडण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे गुरूवारी बंद करण्यात आले आहेत.
दहा दिवसांनी धरणाचे वक्री दरवाजे बंद झाल्याने आता केवळ पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहात 20 मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे 40 मेगॅवॅट वीज निर्मिती केली जात असून वीज निर्मितीनंतर प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठी 74.41 टीएमसी इतका आहे. धरणातील पाणी उंची समुद्र सपाटीपासून 2140.6 फूट तर जलपातळी 652.424 मीटर इतकी आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे 2663 मिलिमीटर , नवजा 2832 मिलिमीटर तर महाबळेश्वर 2812 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.