पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनेसह नवजा, महाबळेश्वरसह परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. कोयनानगर परिसरात आठवडाभरात सुमारे 304 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून नवजा येथे 238 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 182 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात सध्यस्थितीत 24.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. यापैकी 19.31 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. 19 मे पासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात पावसाच्या हलक्या तसेच मध्यम सरी कोसळत आहेत. शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवार सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 24 तासात कोयना येथे 42 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजात 40 मिलिमीटर आणि महाबळेश्वर 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण आणि कराड तालुक्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. सर्वत्र पडणार्या पावसामुळे कोयना धरणातून पाटण, कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.