कोरेगाव : कोरेगाव शहराला केवळ पश्चिम महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या आमदार महेश शिंदे यांनी बांधकाम क्षेत्रातील आणि रस्ते बांधणीतील नवनवीन तंत्रज्ञान कोरेगावात अंमलात आणले आहे. एकंबे रस्ता परिसरात आता रोड स्टॅम्प फूटपाथ तयार केले जात आहेत. आ. महेश शिंदे यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून हा नवीन प्रयोग प्रथमच कोरेगावात राबविला जात आहे.
आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगावचे रूपडे पालटत आहे. कोरेगाव शहरातील एकंबे रस्ता हा संपूर्ण शहरातील आणि लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी वसाहती नव्याने उभ्या राहिल्या आहेत. या रस्त्याचे नुकतेच ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करण्यात आले असून सकाळी मॉर्निंग वॉकला, सायंकाळी इव्हिनिंग वॉकला जाणार्यांची संख्या लक्षणीय असून ही बाब विचारात घेऊन नगराध्यक्षा दिपाली बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्याकडे एकंबे रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कडेला रोड स्टॅम्प काँक्रीटचे फुटपाथ तयार करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार आमदार महेश शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनाला रोड स्टॅम्प काँक्रीट फुटपाथ बांधण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून त्याद्वारे एकंबे रस्त्यावर मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला जाणार्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची जाणार्यांची मोठी सोय होणार आहे. गोळेवाडीपासून ते कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांचा त्याचबरोबर संपूर्ण शहरातील महिलांचा या रोड स्टॅम्प काँक्रीट फूटपाथवर चालताना व्यायाम होणार असून रस्त्यावर चालायला लागत नसल्याने अपघातांचे प्रमाण आपोआप कमी होणार असून कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
आमदार महेश शिंदे यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मतदारसंघ संपूर्ण राज्यात अव्वल स्थानी नेऊन ठेवला आहे. 2019 साली मतदारसंघाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी भौतिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्यक्रम दिला आहे. कोरेगाव शहराला सातारा या जिल्ह्याच्या मुख्यालयाची शॅडो सिटी बनवत असताना त्यांनी भविष्यकाळातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या विचारात घेऊन परदेशातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत कोरेगावात प्रत्यक्षात अंमलात आणले आहे. यापूर्वीच आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष दिपाली बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या पुढाकाराने एकंबे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याद्वारे या परिसराचा पर्यावरण समतोल देखील राखण्यात आला आहे.
मेनरोडच्या दोन्ही बाजूला होणार रोड स्टॅम्प काँक्रीट फुटपाथ; सहकार्य करण्याचे आवाहन
कोरेगाव शहरातून सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग जात असून स्थानिक भाषेत मेन रोड म्हणून तो ओळखला जातो. या मेनरोडवर विद्यानगर, सरस्वती विद्यालय येथून मार्केट यार्डपर्यंत दोन्ही बाजूला रोड स्टॅम्प काँक्रीट फुटपाथ तयार केला जाणार आहे. पादचार्यांना या रस्त्यावरून चालणे सोपे व्हावे, वाढते अपघात टाळावेत आणि वाहतूक कोंडी होऊ नये हा त्यामागील उद्देश असून या फुटपाथ उभारणीवेळी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे. जास्तीत जास्त रुंद फुटपाथ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या फुटपाथमुळे नागरिकांचे हाल होणे थांबणार आहेत, असेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.