कोरेगाव तहसीलदार कार्यालय 
सातारा

Satara News : कोरेगावात लोकशाही दिनाचा फज्जा

खातेप्रमुखांची गैरहजेरी: तक्रारदारांची फरफट; वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या प्रशासनासमोर थेट मांडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनालाच कोरेगाव तालुक्यातील अनेक खातेप्रमुखांनी दांडी मारल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात आयोजित लोकशाही दिनाला मोजके अधिकारी उपस्थित राहिले, तर अनेक महत्त्वाचे खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्याने तक्रारदारांना पुन्हा एकदा प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारण्याची वेळ आली.

कोरेगाव तहसीलदार कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, परिक्षेत्र वनाधिकारी चंद्रहार जगदाळे, नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक अजिंक्य पाटील यांच्यासह कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, याशिवाय अनेक विभागांचे प्रमुख अथवा जबाबदार प्रतिनिधी लोकशाही दिनाला उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले.

आपल्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण होईल, या अपेक्षेने नागरिक लोकशाही दिनाला उपस्थित राहिले होते. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी किंवा जबाबदार प्रतिनिधीच उपस्थित नसल्याने अनेक तक्रारींवर तत्काळ चर्चा होऊ शकली नाही. परिणामी, तक्रारदारांच्या समस्या पुन्हा प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी वेळ काढून प्रशासनाच्या व्यासपीठावर हजेरी लावायची आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र, त्याच कार्यक्रमाकडे पाठ फिरवायची, हा प्रकार संतापजनक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळाल्या. मात्र, सुट्ट्यांचा कालावधी संपल्यानंतर नियमित प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झालेली असताना लोकशाही दिनासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला काही खातेप्रमुखांनी गैरहजर राहणे योग्‍य नाही. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणे आणि त्या तातडीने संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकशाही दिनाला संबंधित अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित असताना गैरहजेरीचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT