आ. रामराजे नाईक निंबाळकर  Pudhari File Photo
सातारा

प्रस्तावित सोळशी धरणातून कोरेगावच्या उत्तर भागाला पाणी द्या : आ. रामराजे

पुढारी वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी आहे. या भागातील शेती सिंचनासाठी वसना उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यात आली आहे. ती योजना पूर्ण क्षमतेने चालत नाही. याशिवाय वसना नदीच्या पश्चिमचेकडील काही गावांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. पूर्वेकडील जवळपास एकवीस गावे आजही पाण्यापासून वंचित असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी येथे प्रस्तावित असलेल्या धरणातून उत्तर कोरेगाव भागातील दुष्काळी 21 गावांना पाणी देण्याची मागणी आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

प्रस्तावित सोळशी धरण महाबळेश्वर तालुक्यात होत आहे. या धरणातील पाणीसाठ्यातून उत्तर कोरेगाव तालुक्यातील 21 गावांच्या शेतीसाठी अग्रक्रमाने पाणी राखीव ठेवण्यात यावे. बोगद्याद्वारे पाणी धोम प्रकल्पामध्ये आणून ते प्राधान्यक्रमाने उत्तर कोरेगाव तालुक्याला देण्यात यावे. त्यामुळे या भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाणार आहे. हे पाणी उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध झाल्यास पिंपोडे बुद्रुक येथील 2145.74, नायगांव 664.31, भावेनगर 402.59, तळीये 639.68, तडवळे 1054.27, वाठार स्टेशन 906.44, विखळे 320.63, फडतरवाडी 354.85, जाधववाडी-दाणेवाडी 235.99, जगतापनगर 175, घिगेवाडी 95.32, दहिगाव 325.82, सोळशी 702.09, वाघोली, नलवडेवाडी, बिचुकले, गुजरवाडी, देऊर, पळशी, कोलवडी या गावांचे 3015 हेक्टर असे मिळून 13 हजार 246 हेक्टर पिकक्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही सर्व गावे मूळ वसना योजनेपासून वंचित राहिलेली गावे आहेत. या योजनेच्या मंजुर पिक रचनेनुसार प्रती 100 हेक्टर क्षेत्रासाठी 0.151 अब्ज घनफूट पाणी आवश्यक आहे. त्यानुसार या वंचित गावांमधील एकूण क्षेत्रासाठी 2 अब्ज घनफूट पाण्याची तरतूद करण्याची मागणी आ. रामराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT