कोरेगाव : कोरेगावमधील एका दुकानात प्रतीक गुरव याचा त्याच्या मित्रानेच रविवारी गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
प्रतीक राजेंद्र गुरव (वय 23, रा. ल्हासुर्णे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र संशयित बाबू ऊर्फ ओंकार संजय जाधव (वय 23, रा. ल्हासुर्णे) याला रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
प्रतीकच्या खूनप्रकरणी भाऊ अजय राजेंद्र गुरव (रा. ल्हासुर्णे) याने कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. कोरेगाव नवीन एसटी स्टँड रस्त्यावर असलेल्या वीरा कलेक्शन या कपड्याच्या दुकानात ओंकार हा कामावर असतो. प्रतीक हा रविवारी दुकानात आला होता. हे दोघेही मित्र असून, त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. यातूनच ओंकारने प्रतीकचा पट्ट्याने गळा आवळून खून केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोनाली कदम व पोनि घनश्याम बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे गतिमान केली. अवघ्या काही तासातच ओंकार जाधवला अटक करण्यात आली. सोमवारी दिवसभर त्याच्याकडे चौकशी सुरू होती.