कोरेगाव : कोरेगाव एस. टी. बसस्थानक देखील नवीन स्वरूपात उभारले जाणार आहे. अधिकारी व कर्मचार्यांच्या विश्रांतीगृहाचे काम हाती घेण्यात येणार आहे. अहोरात्र प्रवासी सेवेत असलेल्या कर्मचार्यांना वातानुकूलित विश्रामगृह उभारून दिले जाईल, असा शब्द आ. महेश शिंदे यांनी दिला.
कोरेगाव आगारात नव्याने दाखल झालेल्या बसेसच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बर्गे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, संजय काटकर, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनील बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर विरकर, राजेंद्र वैराट, प्रीतम शहा, रशीद शेख, दिलीपमामा बर्गे, एस. टी. प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शहा, आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांच्यासह अधिकारी, आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण वाहतूक व्यवस्था बळकट करत रस्ते मार्गांचा विकास केला आहे. प्रत्येक गाव आणि वाडीवस्ती ठोस आणि दर्जेदार रस्त्यांद्वारे जोडली जाणार असून नजीकच्या काळात कोरेगाव शहरालगतच्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर कोरेगाव कुमठे भाडळे या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. संतोष नलावडे यांनी सूत्रसंचलन केले. नीता जगताप यांनी प्रास्तविक केले.
आमदार महेश शिंदे यांनी नवीन बसेसचे लोकार्पण केल्यानंतर स्वतः नवीन बस चालवली. त्यानंतर त्यांनी कोरेगाव आगाराला आणखी नवीन पाच बसेस लवकरात लवकर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. कोरेगावातील नवीन आणि जुन्या बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, लवकरच प्रवाशांना सर्व सुविधायुक्त बस स्थानक उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा नगरपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.