कोरेगाव : कोरेगाव शहरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. भरदिवसा आणि गर्दीच्या आठवडा बाजाराच्या दिवशी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या प्रकाराने पोलिसांच्या गस्त व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कोरेगाव शहरातील आझाद चौक येथील अमर दत्तात्रय माने (वय 42) यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रूपयांचे दागिने लंपास केले. साडेचार तोळ्यांचा गंठण, एक तोळा वजनाची सोन्याची वेल असा मुद्देमाल होता. घटनेच्या वेळी माने कुटुंबीय घरासमोरील किराणा दुकानात व्यस्त असल्याने चोरट्याने संधी साधली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात शोध घेण्यात आला, परंतु कोणताही धागादोरा न मिळाल्याने अखेरीस फिर्याद नोंदविण्यात आली.
आठवडा बाजाराच्या दिवशी शहरात मोठी गर्दी असल्याने पाकीटमारी, घरफोडी आणि वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. दिवसेंदिवस कोरेगाव शहरात क्राईम रेट वाढत आहे. मात्र, यावर पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांचे पथक बाजारात गस्त घालत असले तरी, काठ्या आपटण्यापलीकडे काहीच होत नाही, तर चोरटे मात्र मुक्तपणे उचापती करत आहेत, असे वास्तव आहे.
वाढीव गस्त व सीसीटीव्ही तपासणी होणार?
या घरफोडी व चोऱ्यांमुळे कोरेगाव शहरात भीतीचे सावट आहे. बाजारपेठ आणि निवासी भागात वाढीव गस्त, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने सीसीटीव्ही तपासणी केल्यास चोरींचा उलगडा होवू शकतो.
चोरीच्या घटनांवर तातडीने अंकुश आणण्याची मागणी होत आहे. चोरट्यांना त्वरित जेरबंद न केल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.