Shambhuraj Desai  
सातारा

Shambhuraj Desai | कोरेगाव मतदार संघात उदय सामंत व मी लक्ष घालणार : ना. शंभूराज देसाई

राजाभाऊ बर्गे यांना देणार ताकद ; कार्यकारिणी बदलणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील सर्वात खालच्या पातळीवर राजकारण हे कोरेगाव तालुक्यात सुरु आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आता राजाभाऊ बर्गे यांना ताकद देऊन कोरेगावची पूर्ण कार्यकारणी बदलणार आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत आणि मी कोरेगावात लक्ष घालणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यू येथे आयोजित कोरेगाव विधानसभा मतदार संघ पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, संपर्कप्रमुख शरद कणसे, रेश्माताई जगताप, कोरेगावचे राजाभाऊ बर्गे, पै. चंद्रहार पाटील, विजय जगदाळे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित कोरेगाव मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेला आमदार भाजपच्या वळचणीला जाऊन बसला आहे. सध्या शिवसेनेचे बीएलओ नेमणुका करण्यात आल्या असून ते मतदारांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांना नंतर धमकीचे फोन येतात. पोलिस यंत्रणा पूर्ण आमदारांच्या बाजूने काम करत असून खोट्या केसेस घालणे, तारखेला वारंवार बोलवून दिवसभर पोलिस ठाण्यात बसवणे. तहसीलदार, प्रांत यासह इतर शासकीय कार्यालयातील कामे रखडवणे. कोणत्याच वादात अडकत नसल्यास एखाद्या कार्यकर्त्यांना सांगून वाद घालून कार्यकर्त्यांना केसेसमध्ये अडकवणे यात ते माहीर असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या.

तसेच जगदाळे नामक कार्यकर्त्याला पद दिले तर शासकीय कार्यालयात कामास असलेल्या त्यांच्या पत्नीची विविध ठिकाणी बदली करून त्यांना त्रास देण्यात आला असल्याचे गाऱ्हाणे पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर गायले.

दरम्यान, यावर आम्ही दोघेही याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू. महिन्यात एक आढावा बैठक घेणार आहे. त्यातील पहिली बैठक कोरेगावात घेऊन जनतेच्या समस्यांचा निपटारा केला जाईल आणि जर कोणत्याही शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही पहिले शिवसैनिक आहोत, नंतर मंत्री असा, इशारा दोन्ही मंत्र्यांनी आ. महेश शिंदे यांचे नाव न घेता दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT