सातारा

Amit Shah visit: अमित शहा यांच्‍या दौर्‍यात शिवेंद्रराजेंचा ऑरा चर्चेत

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंना जवळ घेतल्‍याने राज्‍याच्‍या राजकारणात वजन वाढल्‍याचेही दिसले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे देशपातळीवरील शीर्षस्‍थ नेते अमित शहा यांच्‍या कोल्‍हापूर व इचलकरंजी दौर्‍यात सातारा जिल्‍ह्यातील भाजपचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा ऑरा विशेष चर्चेत राहिला. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंना जवळ घेतल्‍याने राज्‍याच्‍या राजकारणात वजन वाढल्‍याचेही दिसले.

भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍यापासून राज्‍यात विक्रमी मतांनी निवडून आलेले छत्रपती घराण्‍याचे वारसदार शिवेंद्रराजे कमालीचे ॲक्‍टिव्‍ह व व्‍यस्‍त झाले आहेत. लातूर जिल्‍ह्याचे पालकमंत्रिपद यशस्‍वीपणे निभावतानाच राज्‍याचे सार्वजनिक बांधकाममंत्रिपद त्‍यांनी अजिबात वादग्रस्‍त होऊ दिलेले नाही. निष्‍कलंक कारकीर्द सुरू ठेवताना शिवेंद्रराजेंनी संघटनात्‍मक जबाबदार्‍या यशस्‍वीपणे सांभाळल्‍या आहेत. सातारा जिल्‍हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्‍यात शिवेंद्रराजेंचा वाटा सिंहाचा राहिला.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पवारांची जिल्‍हा परिषद भाजपमय करायची होती. ते स्‍वप्‍न शिवेंद्रराजेंनी आक्रमक देहबोलीने सत्‍यात उतरवले. त्‍यामुळेच मुख्‍यमंत्र्यांच्‍या गुडबुकमध्‍ये शिवेंद्रराजेंचे नाव आहे. सातत्‍याने बैठका, रोज जनता दरबार, चोवीस तास उपलब्‍ध राहणे व भाजपच्‍या संघटनात्‍मक कार्यकर्त्यांना बळ देण्‍याच्‍या स्‍वभावामुळे शिवेंद्रराजेंनी भाजपच्‍या कोअर टीममध्‍ये वेगळेपण निर्माण केले आहे.

या सर्वाचा परिपाक कोल्‍हापूर व इचलकरंजी दौर्‍यात शनिवारी दिसला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या उपस्‍थितीत कोल्‍हापूर व इचलकरंजी येथे दोन भव्‍य कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजेंना सोबत ठेवले. अमित शहा, फडणवीस व शिवेंद्रराजे यांची एकत्रित छबी पाहिल्‍यावर राज्‍याच्‍या राजकीय वर्तुळात शिवेंद्रराजेंचे वजन वाढल्‍याची चर्चा सुरू झाली. फडणवीस यांच्‍या गुडबुकमध्‍ये गेलेल्‍या शिवेंद्रराजेंचा ऑरा उठून दिसत होता. दोन्‍ही कार्यक्रमांमधील त्‍यांचा व्‍यासपीठावरील वावर वेगळेपण सांगणारा ठरला.

मध्‍यंतरी पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ऊस उत्‍पादक व कारखानदारांच्‍या प्रश्‍नांसाठी फडणवीस यांच्‍या माध्‍यमातून शिवेंद्रराजेंनी शहा यांच्‍याशी चर्चा केली होती. त्‍यानंतर आता कोल्‍हापूर, इचलकरंजी दौर्‍यात मुख्‍यमंत्र्यांच्‍या साथीने शिवेंद्रराजे व्‍यासपीठावर सन्‍मानाने दिसले. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भुजांमध्ये हजारो हत्तींचे बळ संचारले. शिवेंद्रराजेंनी या वाढलेल्या राजकीय वजनाचा वापर जिल्ह्याच्या विकासासाठी वेगाने करावा, अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनतेमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT