Bhushan Gavai | कोल्हापूर सर्किट बेंचचे खटले लवकर निकाली याचे समाधान : भूषण गवई Pudhari
सातारा

Bhushan Gavai | कोल्हापूर सर्किट बेंचचे खटले लवकर निकाली याचे समाधान : भूषण गवई

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

उंडाळे : कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू झाल्याने या विभागातील सर्वसामान्य जनतेला लवकर आणि जवळच्या ठिकाणी न्याय मिळत आहे. त्यांची आर्थिक बचत झाली. इंग्रज सरकारच्या काळात येथे ब्रिटिशांच्या विरोधात जे प्रती सरकार तयार करण्यात आले होते, यामध्ये जसा लवकर खटला निकाली निघत होता, त्याच वेगाने सर्किट बेंचचे खटले निकाली निघत आहेत याचा आनंद व समाधान आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

उंडाळे (ता. कराड) येथे स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर सामाजिक पुरस्कार भूषण गवई यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अध्यक्ष रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, विश्वस्त ॲड. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

भूषण गवई म्हणाले, आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, संघटना यांनी आपणास पुरस्कारासाठी विचारणा केली. पुरस्कार स्वीकारण्यास आपण नम्रपणे नकार दिला. परंतु, उंडाळे येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या पंढरीतील आणि हुतात्म्यांच्या भूमीत मिळणारा हा पुरस्कार स्वीकारावा यापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि हुतात्म्यांच्या भूमीत येऊन त्यांना अभिवादन हा माझ्यासाठी अभिमानाचे आहे. ज्यानी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले अशा स्वातंत्र्य सैनिकांचे भूमीत त्यांना नमन करणे ही मोठी जबाबदारी वाटते. स्वातंत्र्यातून मला सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली. कोणतेही सरकार असले तरी न्याय भावनेतून त्याचा निकाल होण्याची गरज आहे तीच मी भूमिका घेतली. बिल्डरानी घशात घातलेली वनविभागाची जमीन पुन्हा प्लांटेशनसाठी वनविभागाला देण्याचा निर्णय घेतला.

विदर्भातील धुपी जंगलाचा प्रश्न निकाली काढला यासह अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न मला सोडण्यात यश आले. कोल्हापुरातील सर्किट बेंच माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. न्यायमूर्ती असताना अनेकदा मला कोल्हापूरला निमंत्रणे आली पण कोल्हापूरला सर्किट बेंच झाल्याशिवाय कोल्हापुरात यायचे नाही हा माझा निर्धार केला होता. तो मी निर्धार सर्किट बेंच पूर्ण झाले तेव्हा पूर्ण केला. आज या सर्किट बेंचच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तातडीने न्याय उपलब्ध झाला याचा आनंद आहे.

सन्मान पत्राचे वाचन प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. प्रास्ताविक स्मारक समितीचे विश्वस्त रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांनी केले. विश्वस्त ॲड.विजयराव पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.आभार प्रा. धनाजी काटकर यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT