सातारा : कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. सातारा बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे. 500 ते 600 रुपये डझन आंबे झाल्याने सर्वसामान्यांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे.
काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. हवामान बदलामुळे यंदा हापूसच्या लागवडीत घट झाली आहे. नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ 60 टक्के झाले असून हंगाम उशीराने सुरु झाला आहे. गेल्या आठवड्यात कोकणातून आंब्यांच्या पेट्यांची आवक सातारा मार्केट कमिटीत वाढली. आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात 25 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. चार ते आठ डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार 1500 ते 4500 रुपये दर मिळाला आहे. एक डझन तयार हापूसला प्रतवारीनुसार 500 ते 800 रुपये दर मिळाला आहे.
हापूसची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. यंदा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी हंगाम साधारणपणे 30 जूनपर्यंत सुरु असतो. यंदा हापूसचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहण्याची शक्यता असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
यंदा सुरुवातीला आंबा महाग होता. पाडव्या दिवशी आंबा महाग असल्याने खरेदी करण्यासाठी अनेकांनी पाठ फिरवली. तो 1200 ते 1500 रूपये एक डझन होता. तोच आंबा आता 500 ते 800 रूपये डझन झाला आहे. यामुळे चवीला गोड आणि स्वस्त झाल्याने आंबा खरेदी परवडत आहे.- पूनम इंगवले, गृहिणी