सातारा : खेड, ता. सातारा येथील सरपंच सौ. लतिका फरांदे आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांनी 16 लाख 79 हजार 143 रुपयांचा अपहार केल्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. अपहाराचा आरोप सिद्ध झाल्याने तत्कालिन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात दोषी असल्याचा ठपका ठेवून सरपंच लता फरांदे यांनाही अपात्र ठरवण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे तर बांधकाम विभागाचे तत्कालिन शाखा अभियंता एच.बी. चव्हाण यांच्याविरूद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
खेड ग्रामपंचायतीतील अपहाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता साहिल शेख यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी होवून कारवाई झाली. चौकशीअंती खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे दिसून आले, विकास कामांच्या निविदा न करणे, कामाचे अंदाजपत्रक व तांत्रिक मंजुरी नसणे, कामांची मोजमापे मोजमाप पुस्तकांमध्ये नसताना देखील मक्तेदाराला बिल अदा करणे अशी अनेक प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाली असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे.
तसेच शाखा अभियंता चव्हाण यांनी कामाची निविदा प्रकिया न करता 31 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झालेल्या दिवशीच कार्यारंभ आदेश, त्याच दिवशी काम पूर्ण होणे, त्याच दिवशी मूल्यांकन घेणे या गोष्टी संशयास्पद वाटतात आणि चव्हाण यांनी सेवानिवृत्तीनंतर या कामाचे मूल्यांकन केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे चौकशी अधिकार्यांनी अहवालामध्ये नमूद केले आहे.
गटविकास अधिकारी पंचायत समिती जावली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता याला लोकनियुक्त सरपंच सौ. लता फरांदे, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव आणि सेवानिवृत्त शाखा अभियंता जबाबदार असून लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्त पुणे यांना विनंती केली आहे. तसेच या प्रकरणी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी अतुल जाधव यांना दि. 11 जुलै रोजी जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. तसेच सेवानिवृत्त शाखा अभियंता चव्हाण यांच्यावरदेखील विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या अहवालानुसार असे दिसून आले की सरपंच आणि ग्रामसेवकांनी स्वत:च्याच हिताचा कारभार केला. यातून त्यांनी त्यांच्या कामाची पारदर्शकता दाखवून खेडमधील नागरिकांच्या विश्वासाला तडा जाईल असे काम केले आहे. प्रशासन त्यांचा राजीनामा घेईल अथवा नाही घेईल पण त्यांचा नक्कीच जनता राजीनामा घेईल.- निखिल यादव, खेड