सातारा

Satara News: खटाव, माण, कोरेगावला होणार उच्च दाबाने विद्युत पुरवठा

औंध उपकेंद्रात 10 एमव्हीएआर क्षमतेच्या दोन कपॅसिटर बँका कार्यान्वीत

पुढारी वृत्तसेवा

खटाव/ औंध : खटाव, माण आणि कोरेगाव तालुक्यातील जनतेची आणि शेतकऱ्यांची आता कमी दाबाच्या विद्युत पुरवठा समस्येपासून सुटका होणार आहे. 132 के.व्ही. औंध (ता. खटाव) उपकेंद्र येथे 10 एम.व्ही.ए.आर. क्षमतेच्या दोन कपॅसिटर बँकांचे लोकार्पण महापारेषण वीज कंपनीच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सदर प्रकल्पात कपॅसिटर बँक उभारणी व कार्यान्वयनाचे संपूर्ण काम महापारेषण कंपनीच्या डिपार्टमेंटल कर्मचारी व अधिकारी वर्गाने बाह्य मदतीशिवाय स्वतःच्या प्रयत्नांतून पूर्ण केले आहे. या कामात औंध व सातारा येथील देखभाल उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

औंध येथील उपकेंद्रातून खटाव, कोरेगाव व माण तालुक्यांतील कृषी व घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील ग्राहकांना कमी विद्युत दाबाची समस्या भेडसावत होती. उद्योगधंदे, शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांचे यामुळे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर 2022 पासून महापारेषणच्या अधिकारी वर्गाने सखोल अभ्यास करुन वरिष्ठ कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर 2026 मध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.

हा प्रकल्प जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असताना, अधिकारी व कर्मचारी यांनी अवघ्या 15 दिवसांत रात्रंदिवस परिश्रम करुन एप्रिलच्या तीव्र उष्णतेत हे काम पूर्ण केले. या प्रकल्पासाठी अधिक्षक अभियंता प्रांजळ कांबळे, कार्यकारी अभियंता हुसे, सुनीता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. औंध उपकेंद्र प्रमुख जयवंत कुंभार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ. पवार, कृष्णात पाटील, महेश कारखानीस यांनी नियोजन व अंमलबजावणी केली. या प्रकल्पामुळे खटाव, माण आणि कोरेगाव भागातील वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांना कमी विद्युत दाबाच्या समस्येतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT